२०२२मध्ये मुंबई महानगर पालिका निवडणुका असल्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणत्या तरतुदी आणि नव्या घोषणा केल्या जातात, याविषयी मोठी उत्सुकता होती. अर्थमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात अनेक घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबईच्या नागरी सुविधा सुधारण्यासाठीच्या केलेल्या घोषणांचा समावेश आहे. त्यात मुंबईची वाहतूक सुधारण्यासाठीच्या प्रस्तावांसाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत.
विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर
विरार, भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण, पेण व अलिबाग या शहरांच्या विकासासाठी तसेच जेएनपीटी, नवी मुंबई विमानतळ आणि शिवडी-न्हावाशेवा मार्गाला जोडणाऱ्या ४० हजार कोटी रुपये किंमतीच्या १२६ किमी लांबीच्या विरार ते अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरसाठीच्या भूसंपादनाचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. ठाणे खाडीला समांतर १५ किमी लांबीचा आणि ४० मीटर रुंदीचा ठाणे कोस्टल रोड उभारण्यात येत आहे. त्यासाठी १ हजार २५० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचं अजित पवार म्हणाले.
वरळी-शिवडी ४ पदरी उड्डाणपूल
दरम्यान, शिवडी-न्हावाशेवा प्रकल्पाविषयीही अजित पवारांनी उल्लेख केला. “मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्था जागतिक स्तरावरची असायला हवी. त्यासाठी शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. वांद्रे-वरळी सागरी मार्ग शिवडी-न्हावाशेवा मार्गाला जोडण्यासाठी वरळी ते शिवडी या चारपदरी उड्डाणपुलाचं काम सुरू झालं असून ते तीन वर्षांत पूर्ण करण्याचं नियोजन आहे”, असं ते म्हणाले.
यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात ४०० कोटींची तरतूद केल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
“मुंबईतल्या १४ मेट्रो लाईनचे ३३७ किमी लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी १ लाख ४० हजार ८१४ कोटी खर्च अपेक्षित आहे. मेट्रो मार्ग २ अ, मेट्रो मार्ग ७ यावरची कामं २०२१पर्यंत पूर्ण करण्यात येतील. गोरेगाव मुलुंड लिंकरोड प्रकल्पाची किंमत ६६०० कोटी रुपये असून निविदांची कारवाई सुरू आहे”, असं ते म्हणाले.
मुंबईसाठीच्या इतर घोषणा व तरतुदी
- मुंबई-ठाणे-नवी मुंबई या शहरांभोवती असलेल्या जलमार्गांचा वाहतुकीसाठी वापर होईल. वसई-कल्याण हा जलमार्ग सुरू करण्यात येईल.
- वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू करण्यात आले आहे. १७.१७ किमी लांबीच्या या प्रकल्पाची किंमत ११ हजार ३३३ कोटी रुपये आहे. वांद्रे, वर्सोवा-विरार या सागरी सेतूची अंदाजे किंमत ४२ हजार कोटी रुपये आहे. कामाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
- कोस्टल रोडचं काम जलदगतीने सुरू असून २०२४पूर्वी हा मार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
- रेल्वे रुळांवरच्या ७ उड्डाणपुलांची कामं हाती घेण्यात आली आहेत.
- वांद्रे, कुर्ला संकुलातील सिटी पार्क ते महाराष्ट्र संकुलातील उद्यानाला जोडण्यासाठीच्या पादचारी पुलासाठी ९८ कोटी ८१ लाखांची तरतूद.
- बीकेसीमधील सायकल मार्गावर बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींना चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे मुंबईच्या पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर मुंबई महानगर क्षेत्र विकास महामंडळामार्फत सायकलींसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात येईल.
- मुंबई पालिकेच्या माध्यमातून वरळी, वांद्रे, धारावी, घाटकोपर, भांडुप, वर्सोवा व मालाड येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी १९ हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
- समुद्रातील खारे पाणी गोड करण्याचा प्रकल्प मालाडमध्ये मनोरेल उभारण्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण झाले आहे.
- मिठी नदी पुनरूज्जीवित प्रकल्प मार्च २०२१पासून सुरू होणार असून त्यासाठी ४५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
- मुंबईल्या दहिसर, बोईसर व ओशिवरा नद्या पुनरुज्जीवीत करण्यासाठी १ हजार ५५० कोटींची कामे सुरू करण्यात येत आहेत.
- मुंब्रा बायपास जंक्शन, शीळ-कल्याण फाटा, शीळ फाटा व कल्याण फाटा जंक्शनवर उड्डाणपूलाची निर्मिती, महामार्गाचे रुंदीकरण, कल्याण फाटा अंडरपासचे काम प्रगतीपथावर आहे.