मुंबई : विधान परिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आक्रमकपणे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. गोंधळ वाढू लागल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत न्यायालयाचा निकाल येताच कोकाटे यांच्या राजीनाम्याचा निर्णय राज्यपाल किंवा सभागृह घेईल, असे जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधान परिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. सभापती राम शिंदे यांनी कोकाटे विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांच्या बाबतचा निर्णय विधानसभा घेईल, असे जाहीर केले. त्यांच्या उत्तरावर विरोधी पक्षाचे समाधान झाले नाही, विरोधी पक्ष आणखी आक्रमक झाला. सरकारमधील एका मंत्र्याला न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अद्यापही शिक्षेला स्थगिती मिळाली नाही, त्यामुळे कोकाटे यांच्या मंत्रीपदाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांच्या मागणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू झाले.

सभागृहात गोंधळ वाढत असतानाच सभागृहात दाखल झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंधळ थाबवीत, माणिकराव कोकाटे यांच्याबाबतची सुनावणी न्यायालयाने पूर्ण केली आहे, अद्याप अंतिम निकाल दिला नाही. न्यायालयाचा निकाल हाती आल्यानंतर राज्यपाल किंवा सभागृह कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेईल, असे जाहीर केले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू होऊन प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या वतीने राजपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्ताव मांडला. त्यानंतर सभागृहात पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या.