मुंबई : राज्य शासन उभारत असलेल्या किंवा अनुदान देत असलेल्या महनीय व्यक्तींच्या आठ स्मारकांचे काम गेली अनेक वर्षे रेंगाळले आहे. तरीही अर्थसंकल्पात तीन नव्या स्मारकांची घोषणा करण्यात आली. आग्रा, पानिपत आणि संमगमेश्वर येथे ही तीन नवी स्मारके राज्य शासन बांधणार आहे.

अटलबिहारी वाजपेयींचे मुंबईत स्मारक

भारताचे दिवंगत प्रंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी २२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आद्या शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे.

नवी स्मारके कुठे?

१. आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज मोगलांच्या नजरकैदेत होते. शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका या प्रेरणादायी प्रसंगावर आग्रा येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने तेथे जागा उपब्लध करून घेण्यात येईल.

२. कोकणातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांना मोगलांच्या सेनेने कैद केले. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या स्वाभीमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी तिथे स्मारक उभारण्यात येणार आहे.

३. अफगाणिस्तानाचा अहमदशहा अब्दाली आणि मराठा सैन्य यांच्यात इ. स. १७६१ मध्ये पानिपत येथे युद्ध झाले. मराठा सैन्याच्या पराक्रमाची साक्ष म्हणून पानिपत येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी हरियाणा शासनाकडून या स्मारकासाठी जागा उपलब्ध करु घेण्यात येईल.

ही स्मारके रखडली…

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे शिवसृष्टी प्रकल्प चार टप्प्यात उभारण्यात येत आहे. शिवसृष्टीच्या उर्वरित कामांसाठी ५० कोटी निधीची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. अनेक वर्षे काम सुरू आहे.

● छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ असलेल्या तुळापूर आणि वढू ब्रुदूक (जि. पुणे) येथील स्मारकाच्या कामासाठी यापूर्वीच निधीची तरतूद करण्यात आली आहे.

● दादर येथील इंदू मिलच्या जागेवर बांधण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या स्मारकाचे काम अनेक वर्षे सुरू आहे.

● साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ असलेल्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील स्मारकासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

● पुण्यातील संगमावाडी येथे वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे काम वेळेत पूर्ण करण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.

Story img Loader