मुंबई : कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले असून त्यांचा दबाव वाढत आहे. त्यांच्याबाबत कोणता निर्णय घ्यावा आणि विरोधकांना प्रत्युत्तर कसे द्यावे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चाही झाल्याचे समजते.

कोकाटे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका बळकावल्या आहेत. त्यासाठी त्यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून सत्र न्यायालयाने त्यास अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यांना दोषी धरण्याच्या निर्णयास न्यायालयाने अद्याप स्थगिती दिली नसून निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायालयाने स्थगिती नाकारल्यास कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल आणि न्यायालयाने स्थगिती दिल्यास राजीनाम्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

पण कोकाटे यांनी सदनिका बळकावल्या, ही वस्तुस्थिती असल्याने आणि न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावल्याने नैतिकतेच्या मुद्द्यावर त्वरित राजीनामा द्यावा, अशी विरोधकांची मागणी आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी विधान परिषदेत गदारोळ केला व सरकारवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह अन्य आरोपींवर न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे.

या प्रकरणासह अन्य प्रकरणात मुंडे यांच्यावर गैरव्यवहाराचे अनेक आरोप झाले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. मात्र त्यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही, अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका असून फडणवीस यांचेही तेच मत असल्याने मुंडे यांना आजपर्यंत संरक्षण मिळाले आहे. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून त्यांना विधिमंडळात घेरण्याची रणनीती आखण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader