मुंबई : महसुलीच्या जमेच्या ५५.७२ टक्के खर्च हा कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन आणि व्याज फेडण्यासाठी खर्च होणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत या खर्चात सात टक्के वाढ अपेक्षित आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर १ लाख ७२ हजार कोटी खर्च होईल. टक्केवारीत हे प्रमाण ३०.८० टक्के होते. चालू आर्थिक वर्षात वेतनावर १ लाख ४६ हजार कोटी खर्च झाला होता. निवृत्तिवेतनावर पुढील आर्थिक वर्षात ७५,१३७ कोटी खर्च गृहीत धरण्यात आला आहे. हे प्रमाण एकूण जमेच्या १३.३९ टक्के आहे. कर्जावरील व्याज फेडण्याकरिता ६४,६५९ कोटी खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हे प्रमाण ११.५३ टक्के आहे. चालू वर्षात व्याज फेडण्यासाठी ५४,६८७ कोटी खर्च झाला.

वेतन, निवृत्तिवेतन आणि कर्जावरील व्याज फेडण्यासाठी एकूण ३ लाख १२ हजार कोटी खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात हा खर्च २ लाख ६० हजार कोटी आहे.

वेतन, निवृत्तिवेतन आणि कर्जावरील व्याज फेडण्याकरिता एकूण ५५.७२ टक्के खर्च होणार आहे. चालू आर्थिक वर्षात ४८.६१ टक्के खर्च झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत खर्चात सात टक्के वाढ झाली आहे.

पर्यटन विभागासाठी भरघोस तरतूद

मुंबई : राज्यातील पर्यटनाला गती मिळावी यासाठी राज्य सरकारने यंदा या विभागासाठी एक हजार ९७३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यात विशेषत मुंबईत येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. नाशिकमध्ये दोन वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक पर्यटन सेवा, सुविद्या व संधी तयार केल्या जात आहेत. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने बारा कॅरव्हॅन व हवाई सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. थंड हवेच्या ठिकाणी जाण्यास काही पर्यटक रस्ता सेवेमुळे टाळतात. त्यांच्यासाठी हेलिकॅाप्टर सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

Story img Loader