मुंबई : विरोधी पक्षात अनेक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना अनुभव मोठा आहे, त्यांनी मंत्री म्हणूनही काम केले आहे. पण, ते सरकारविरोधात बोलत नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र नाराज आहे, तसा मीही नाराज आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केल्यामुळे पवारांच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला.

विधिमंडळाच्या आवारात बोलताना रोहित पवार म्हणाले, आता खऱ्या अर्थाने लढण्याचे दिवस आहेत. पण विरोधी पक्ष लढत नाही. विरोधी पक्षात अनेक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना मंत्रीपदाचा मोठा अनुभव आहे, तरीही हे नेते सरकारच्या विरोधात बोलत नाहीत, लढत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नाराज आहे, तसा मीही नाराज आहे.

मी सात वर्ष पक्षाच्या वतीने लढत आहे. पण, कुठेतरी मी कमी पडलो असे काही नेत्यांना वाटले असावे किंवा माझ्याबाबत भविष्यात काहीतरी महत्त्वाचा निर्णय घ्यावयाचा असेल म्हणून माझ्यावर सध्या पक्षाने कोणतीही जबाबदारी टाकली नसावी. पण, फक्त आमदार म्हणूनही मी लढत राहीन. शरद पवारांचा पाठिंबा आहे, तो पाठिंबा माझ्यासाठी खूप काही आहे. दरम्यान, छावा चित्रपट पाहिल्यानंतर रोहित पवारांनी समाजमाध्यमांवर पोस्ट प्रसारित केली. लाचारी सोडून कसल्याही संकटाला भिडण्याची, लढण्याची आणि झुंजण्याची प्रेरणा या चित्रपटातून मिळते, असे ते म्हणाले.

Story img Loader