अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपाच्या नेत्यांनी हातामध्ये अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचं बॅनर धरुन घोषणाबाजी केली. ‘दाऊदच्या दलला मंत्र्यांचा राजीनामा घ्या’, ‘महाराष्ट्राचे सरकार दाऊदचे समर्थक आहे का?’ अशी वाक्य या बॅनरवर लिहिण्यात आलेली.
नक्की वाचा >> Maharashtra Budget Session: …म्हणून आदित्य ठाकरेंची विधानभवनातील एन्ट्री ठरतेय चर्चेचा विषय
‘दाऊद के दलालो को… को जूते मारो सालों को,’ ‘नवाब मलिक कौन है?… दाऊद का दलाल है…’ अशा घोषणा यावेळी भाजपाच्या आमदारांनी दिल्या. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासहीत भाजपाने इतर अनेक भाजपाचे आमदार उपस्थित होते.
फडणवीसांनी केली टीका…
राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने संघर्षांचा संकल्प केलाय. हे सरकार दाऊद समर्पित असल्याची टीका करत फडणवीस यांनी बुधवारी सरकारची कोंडी करण्याचे संकेत दिलेत. दुसरीकडे, भाजपा सरकारच्या काळातील घोटाळेबाजांवर कारवाईचा इशारा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारकडून जोरदार प्रत्युत्तराचे सूतोवाच केले आहे.
नक्की पाहा >> Video: “कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे…”; सावित्रिबाईंबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन टीका
राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवार म्हणाले…
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथिगृहावर आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. चहापान कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना नबाव मलिक यांच्या राजीनाम्यासंदर्भातील प्रश्नावरही अजित पवारांनी भाष्य केलं. राजीनाम्यासाठी विधिमंडळाचे कामकाज रोखण्याच्या विरोधकांच्या इशाऱ्यावर बोलताना पवारांनी आघाडीच्या नेत्यांनी विचारांती मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले असल्याचे सांगितलं. कोणाचा राजीनामा घ्यायचा आणि कोणाचा नाही याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. अनेक निर्णय सभागृहातील परिस्थिती पाहून होत असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.