राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला वादळी सुरुवात झालीय. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर अधिवेशनच्या पूर्वसंध्येलाच आरोप प्रत्यारोप केले होते. आज पहिल्याच दिवशी या संघर्षाची झलक पुन्हा एकदा पहायला मिळाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी गदारोळ केल्यानंतर सभागृहाच्याबाहेर विधानभवनाच्या आवारामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांनी राज्यापालांविरोधात घोषणाबाजी केली. राज्यपालांचा विरोध करण्यासाठी एका शिवसेना आमदाराने चक्क शीर्षासनही केलं.
नक्की पाहा >> Video: “कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे…”; सावित्रिबाईंबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन टीका
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांमुळे नाही तर सत्ताधाऱ्यांमुळेच सभागृहात गदारोळ झाल्याचं पहायला मिळालं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तुफान घोषणाबाजी केली. यामुळे राज्यपालांना आपलं अभिभाषण अवघ्या दोन मिनिटांमध्ये आटोपतं घ्यावं लागलं. त्यामुळे विरोधकांनी देखील या प्रकाराचा निषेध करत सरकारवर टीका केली आहे. मात्र या प्रकारानंतर शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाच्या आवारात राज्यापालांविरोधात घोषणाबाजी केली.
नक्की वाचा >> Maharashtra Budget Session: …म्हणून आदित्य ठाकरेंची विधानभवनातील एन्ट्री ठरतेय चर्चेचा विषय
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या त्या विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यानंतर सभागृहाबाहेर येऊन शिवसेना आमदार घोषणाबाजी करु लागले. ‘राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव’च्या घोषणा शिवसेना आमदारांनी दिल्या. तसेच ‘राज्यपाल… राज्यपाल… खाली डोकं वर पाय,’ अशा घोषणाही यावेळी शिवसेना आमदारांनी दिल्या.
नक्की वाचा >> Maharashtra Session: ‘दाऊद के दलालो को… जूते मारो सालों को,’ ‘नवाब मलिक कौन है?…’; भाजपाची घोषणाबाजी
शिवसेना आमदारांकडून ‘राज्यपाल… राज्यपाल… खाली डोकं वर पाय’ अशा घोषणा दिल्या जात असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन करुन राज्यपालांचा निषेध केला. खाली डोकं वर पाय या घोषणेला अनुसरुन दौंड यांनी शीर्षासन केलं. दौंड यांच्या या अनोख्या निषेधाची झकल तेथील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आपल्या कॅमेरात टीपली.
दरम्यान, सभागृहामध्ये सत्ताधारी आमदारांच्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी आपलं भाषण अवघ्या दोन मिनिटांत गुंडाळलं आणि ते निघून गेले. या मुद्द्यावरून आता विरोधी पक्षाने कठोर भूमिका मांडली असून सत्ताधारी काँग्रेसकडून “राज्यपालांना परत पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यावर विचार सुरू आहे”, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.