राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या बाळाला घेऊन विधिमंडळात दाखल झाल्या होत्या. पण, बाळाला ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षात सोयी-सुविधा नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या धुळीत माझ्या बाळा ठेऊ शकत नाही. त्यामुळे मला जावं लागत आहे, अशी खंत सरोज अहिरे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना व्यक्त केली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आठ दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष भेटले नसल्याने प्रधान सचिवांना हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यासाठी पत्र दिलं होतं. आज, हुरूप घेऊन विधानसभेत आले होते. पण, कोणतीही व्यवस्था झाली नसल्याचं दिसत आहे. प्रचंड धूळ तेथील हॉलमध्ये आहे. अशा परिस्थितीत माझ्या आजारी बाळाला तिथे ठेऊ शकत नाही. गोळ्या देऊन बाळाला घेऊन आले आहे,” असं सरोज अहिरे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “करोनात हे आपल्या करीनाबरोबर घरात होते”, प्रकाश महाजनांच्या विधानावर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमच्या भावावर…”

“आईचं पहिलं कर्तव्य फक्त बाळासाठी राहिलं पाहिजे. परंतु, नाण्याच्या दोन बाजू आहेत, एक आई तर दुसरी आमदार म्हणून. दुसरी बाजू बजावण्यासाठी आले होते. मात्र, आज मला जावं लागत आहे. या धुळीत माझ्या बाळाला ठेऊ शकत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील सर्व कार्यालयांत महिलांसाठी व्यवस्था करावी,” अशी मागणी सरोज अहिरे यांनी केली आहे.

हेही वाचा : सत्यजीत तांबे पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार?; स्वत:च दिलं उत्तर, म्हणाले…

दरम्यान, नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात आमदार सरोज अहिरे लहान बाळाला घेऊन आल्या होत्या. तेव्हा त्यांच्यासाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. या अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही समोर अहिरे या आपल्या लहान बाळाला घेऊन आलेल्या आहेत. पण, हिरकणी कक्ष खराब असल्याने विधिमंडळातून जाणं त्यांनी पसंत केलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra budget session 2023 saroj ahire upset for child hirkani kaksha demand cm eknath shinde and tanaji sawant ssa