राज्यातील स्त्री-भ्रूण हत्या रोखणे, मुलींचे शिक्षण व आरोग्य सुधारणे, बालविवाह रोखणे, भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे या व्यापक दृष्टीकोनातून सर्व गटातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या मुलीसाठी ‘सुकन्या’ योजना या नावाने नवीन योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. ही योजना १ जानेवारी २०१४ पासून राबविण्यात येईल.
दारिद्रय रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नांवे (दोन अपत्यांपर्यंत) २१,२०० रुपये मुलीच्या जन्माच्या एक वर्षाच्या़ आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून तिच्या वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकूण एक लाख रुपये इतकी रक्कम देण्यात येईल. अतिरिक्त लाभ म्हणून या योजनेसह केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजना व त्यात समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेचासुद्धा लाभ देण्यात येणार आहे. आम आदमी विमा योजनेत या मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून (कॉर्पस रुपये 21 हजार 200) नाममात्र 100 रुपये प्रतिवर्षी इतका हप्ता जमा करून या मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरविला जाईल. पालकाचा मृत्यू झाल्यास खालील प्रमाणे रक्कम देण्यात येईल.
नैसर्गिक मृत्यू 30 हजार रुपये, अपघातामुळे मृत्यू/कायमचे अपंगत्व 75 हजार रुपये, दोन डोळे अथवा दोन अवयव अथवा एक डोळा व एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास 75 हजार रुपये आणि एक डोळा किंवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास 37 हजार 500 रुपये.
त्याचप्रमाणे आम आदमी विमा योजनेत समाविष्ट असलेल्या शिक्षा सहयोग योजनेत त्या मुलीला 600 रुपये इतकी शिष्यवृत्ती प्रती 6 महिने, इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये ही मुलगी शिकत असताना दिली जाईल. या योजनेचा लाभ हा बालिका 18 वर्षापर्यंत अविवाहित असणे त्याचप्रमाणे 10 वी उत्तीर्ण आणि वडील महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
दारिद्र्यरेषेखालील मुलींसाठीच्या ‘सुकन्या’ योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी
सर्व गटातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या मुलीसाठी 'सुकन्या योजना' या नावाने नवीन योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली.
First published on: 04-09-2013 at 03:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cabinet apporves sukanya scheme for girls