मुंबई : वर्सोवा- विरार सागरी सेतू रद्द करून आता केवळ उत्तन (भाईंदर)- विरारदरम्यान सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ५५ किमीच्या (जोडरस्त्यासह) या सागरी सेतूसाठी नव्याने व्यवहार्यता अभ्यास करणार आहे. या प्रकल्पाचा आराखडाही पुन्हा तयार करण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला.
मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने ९४ किमीचा वर्सोवा- विरार सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पासाठी ६३ हजार रुपये खर्च अपेक्षित होता. पण आता मात्र ९४ किमीचा सागरी सेतू ५५ किमी झाला आहे. वर्सोवा-विरार सागरी सेतू प्रकल्प रद्द करून आता केवळ उत्तन-विरार सागरी सेतू बांधण्यात येणार आहे. उत्तन येथेच म्हाळगी प्रबोधिनी ही एक स्वायत्त प्रशिक्षण आणि संसोधन संस्था कार्यरत आहे.
व्यवहार्यता अभ्यास
महापालिकेच्या सागरी किनारा रस्त्याला जोडून सागरी सेतू पुढे कसा न्यायचा याचा अभ्यास केला जाणार आहे. सागरी सेतूची लांबी कमी झाल्याने साहजिकच खर्चही कमी झाला आहे. खर्चात किमान २५ हजार कोटी रुपयांची कपात होणार असून हा निधी आता विरार – पालघर सागरी सेतूसाठी वापरण्यात येणार आहे.
दोन टप्प्यांत काम
मुंबई महापालिकेचा सागरी किनारा (कोस्टल रोड) रस्ता संपेल तेथून जोडरस्त्याद्वारे उत्तन- विरार सागरी सेतूला सुरुवात होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने यास मान्यता दिली आहे. उत्तन- विरार सागरी सेतूचे काम पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात उत्तन- विरार सागरी सेतूचा विरार- पालघर असा विस्तार केला जाणार आहे.