लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील वीजग्राहकांना खूष करण्यासाठी घरगुती, औद्योगिक आणि यंत्रमागधारकांना वीजदरात सरासरी २० टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. त्यामुळे घरगुती ग्राहकांच्या वीजबिलात दरमहा ८० ते ४११ रुपयांची बचत होणार आहे. वीजदरातील सवलतीपोटी दरमहा ७०६ कोटी रुपयांचे अनुदान लागणार आहे. त्यामुळे सरकारी अनुदानाचा हप्ता थकल्यास त्याच महिन्यापासून वीजदरातील सवलत रद्द करावी लागेल आणि वाढीव दराने वीजबिल पाठवावे लागेल, असा इशारा राज्याच्या ऊर्जा विभागाने दिला आहे. त्यामुळे ही सशर्त वीजदर कपात किती दिवस टिकणार असा प्रश्न आताच उपस्थित झाला आहे.
राज्यातील वीजदराचा फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्या समितीच्या शिफारशींचा विचार केल्यानंतर आणि तिजोरीवर पडणारा भरुदड लक्षात घेऊन वीजदरात सरासरी २० टक्के सवलत देण्याचे राज्य सरकारने ठरवले. या सवलतीसाठी ६०६ कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून तर १०० कोटी रुपये ‘महानिर्मिती’ आणि ‘महापारेषण’ यांच्या तिजोरीतून असे ७०६ कोटी रुपयांचे अनुदान दरमहा देण्यात येणार आहे. पण हे अनुदान किती काळापर्यंत देण्यात येईल याचा कसलाही उल्लेख निर्णयात नाही. त्यामुळे निवडणुकांपर्यंत वेळ मारून नेण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट आहे. वीजदरातील या सवलतीला राज्य वीज नियामक आयोगाची मान्यता घेण्याची औपचारिकता पूर्ण करावी लागणार आहे. वीजदरात सवलत देताना दरमहा ३०० युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना सवलतीमधून वगळण्यात आले आहे. तसेच रेल्वे, पाणीपुरवठा, पथदिवे यांनाही वगळण्यात आले आहे.
घरगुती ग्राहकांना ८० पैसे ते एक रुपया ३७ पैसे प्रति युनिट असा दिलासा मिळणार आहे. औद्योगिक ग्राहकांना प्रति युनिट दीड रुपये ते एक रुपया ६० पैसे इतका दिलासा देण्यात आला आहे. घरगुती ग्राहकांना दिल्लीतील ‘आप’ सरकारच्या धर्तीवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची मागणी काही मंत्र्यांनी केली. पण ती व्यवहार्य ठरणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी ती फेटाळली.
* दरमहा १०० युनिटपर्यंत वीजवापरणाऱ्या घरगुती ग्राहकांचा वीजदर प्रति युनिट ४ रुपये १६ पैसे आहे तो तीन रुपये ३६ पैसे इतका कमी करण्यात आला आहे. तर १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांचा सध्याचा दर प्रति युनिट सात रुपये ४२ पैसे असून तो सहा रुपये पाच पैसे इतका कमी करण्यात आला आहे.
* औद्योगिक ग्राहकांचा वीजदर आठ रुपये ६१ पैसे असून तो सात रुपये एक पैसा प्रति युनिट इतका कमी करण्यात आला आहे.
* यंत्रमागधारकांचा वीजदर सात रुपये २६ पैशांवरून पाच रुपये ६६ पैशांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
* शेतकऱ्यांना प्रति अश्वशक्ती प्रति महिना २८ ते ६० रुपयांची सवलत वीजदरात देण्यात आली आहे. तर मीटरवरील कृषीपंपांना प्रति युनिट ५८ पैशांची सवलत देण्यात आली आहे.

Story img Loader