मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी करण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दिले. मंत्रिमंडळाचा विस्तार हा ११ किंवा १२ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार असून त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. विधानसभा सदस्यांच्या शपथविधीचे अधिवेशन ७ ते ९ डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार असून राज्यपालांचे अभिभाषण व विधानसभा अध्यक्षांची निवड ९ डिसेंबरला होणार आहे.
हेही वाचा >>> घोषणा अन् अभूतपूर्व गर्दी…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद नाखुशीने का होईना, स्वीकारले असले तरीही गृह खात्याचा आग्रह कायम ठेवला आहे. मात्र भाजपने त्यास ठाम नकार दिला असून त्याऐवजी महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खाते त्यांना देण्याचा प्रस्ताव दिला आहे. शिंदे यांनी आता शपथ घेतली असल्याने भाजपने शिवसेनेला (एकनाथ शिंदे) देऊ केलेली खाती शिंदे स्वीकारतील, असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे. शिवसेनेला ११ किंवा १२ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही तेवढीच मंत्रीपदे हवी आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते पुन्हा मिळावे, असा आग्रह असून भाजप त्यास अनुकूल आहे. पण गेल्या मंत्रिमंडळात मिळालेल्या खात्यांसह आणखीही काही खात्यांची मागणी त्यांनी केली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला कोणती खाती द्यावीत आणि त्यांच्या कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे, याबाबत फडणवीस हे भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत.
भाजपकडून नवे चेहरे
भाजपकडे २० मंत्रीपदे असतील, पण त्यापैकी काही रिक्त ठेवली जाणार आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात कोणाला संधी द्यायची, याबाबत फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहेत. सत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, असा भाजपचा विचार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा आदी ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासंदर्भातही विचारविनिमय सुरू आहे. मंत्री व खातेवाटपाबाबत निर्णय न झाल्याने गुरुवारी केवळ फडणवीस, शिंदे व पवार अशा तिघांचाच शपथविधी झाला. मात्र आठवडाभरात हे तीनही नेते एकत्रित बसून मंत्रिमंडळाबाबत निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले.
वादग्रस्त नावांवरून गोंधळ
●भाजपने अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला आक्षेप घेतला आहे.
●गेल्या मंत्रिमंडळातील कामगिरी समाधानकारक नसून अन्यही काही कारणे त्यासाठी आहेत. तरीही यापैकी काही मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याचा शिंदे यांचा प्रस्ताव आहे.
●शिवसेनेतील कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी द्यायची, यावरूनही गोंधळ असून अनेक नेत्यांनी शिंदे यांची भेट घेऊन मंत्रीपदाची मागणी केली आहे.