शिवसेनेच्या सत्तेतील सहभागाचा तिढा सुटत नसल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १ डिसेंबरऐवजी ३ डिसेंबरनंतर होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला सरकारमध्ये सहभागी करण्याचा निर्णय न झाल्यास भाजपच्या आणखी मंत्र्यांचा शपथविधी होईल आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सध्या केवळ १० मंत्री असल्याने विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. नवीन मंत्र्यांचा शपथविधी १ डिसेंबर रोजी घेण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र अजून शिवसेनेबरोबर तोडगा निघू न शकल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार ३-४ डिसेंबरनंतर होऊ शकेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भाजपबरोबर असलेल्या रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी पक्ष, शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या सत्तेतील सहभागाविषयी भाजपने कोणतीही चर्चा अजून केलेली नाही. त्यांना विधानपरिषदेच्या जागा देण्याची भाजपची फारशी तयारी नसल्याने त्यांच्यासाठी केवळ महामंडळांचाच पर्याय दिला जाणार असल्याचे समजते.
सेनेचा विरोध बोथट करण्यासाठी?
गेले काही दिवस शिवसेनेने दुष्काळाच्या मुद्दय़ावरुन सरकारविरोधात वातावरण तापविले होते. आता शिवसेनेला सत्तेचे गाजर दाखविल्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी सरकारमधील सहभागाची चर्चा सुरु करण्यात आल्याचे समजते. आपण देऊ तेवढी मंत्रिपदे व खाती घेतली, तरच शिवसेना सत्तेत सहभाग होऊ शकते. पण सरकार टिकविण्यासाठी शिवसेनेच्या सर्व अटी मान्य करू नयेत अशी भाजपची भूमिका आहे. शिवसेनेतील अनेक नेत्यांना सत्ता हवी असून त्यांचा पक्षनेतृत्वावर दबाव आहे. सत्तेतील सहभागाची आशा दाखवत राहिल्यास दुष्काळ आणि अन्य प्रश्नांवर तसेच विधिमंडळातही शिवसेनेच्या विरोधाची धार बोथट राहील, अशी भाजपची खेळी आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर
शिवसेनेच्या सत्तेतील सहभागाचा तिढा सुटत नसल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १ डिसेंबरऐवजी ३ डिसेंबरनंतर होण्याची शक्यता आहे.
First published on: 30-11-2014 at 05:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cabinet expansion put on hold