विश्वासदर्शक ठरावाआधीच शिवसेनेला सत्तेत घेऊन मंत्रिमंडळ विस्तार करा, अशी मागणी करणाऱया शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विधानसभेच्या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार नाही, हे स्पष्ट केले.
भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी सध्या शिवसेनेशी चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये येत्या ७ किंवा ८ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्यामध्ये शिवसेनेच्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ द्या, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ९ तारखेला शिवसेनेच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱयांची बैठक मुंबईत बोलावण्यात आली आहे. भाजपने सत्तेत सहभागी करून घेतले नाही, तर काय करायचे, याचा निर्णय याच बैठकीत होणार आहे. शिवसेनेच्या मागणीप्रमाणे भाजप अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करणार का, याकडे सगळ्याचे लक्ष होते. मात्र, शिवसेनेच्या कोणत्याही दबाबापुढे झुकणार नसल्याचेच भाजपने ठरविले असल्याचे दिसते. त्यामुळेच पुढील आठवड्यात विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांच्या भूमिकेमुळे आता शिवसेना काय करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार का, या प्रश्नाचे उत्तर येत्या रविवारीच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.