मुंबई : खातेवाटपात भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या वाटय़ाला तुलनेत दुय्यम खाती आल्याची टीका होत असली तरी मंत्र्यांचे खातेवाटप योग्य प्रकारे झाले असल्याचा दावा भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केला.
फडणवीस सरकारमध्ये महसूल आणि वित्त यांसारखी महत्त्वाची खाती भूूषविलेल्या अनुक्रमे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तुलनेत कमी महत्त्वाची खाती सोपविण्यात आली. यावरून विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही; परंतु चंद्रकांत पाटील यांनी मंत्र्यांचे खातेवाटप योग्य प्रकारे झाले आहे, असा दावा केला. तसेच मला मिळालेल्या खात्यांबाबत समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या रचनेत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य ही खाती सोपविण्यात आली आहेत.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री म्हणून राज्यातील शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची पाटील यांची योजना आहे. या देशात इंग्रज राज्य करू शकले, कारण त्यांनी सगळय़ात आधी या देशाच्या शिक्षणव्यवस्थेवर घाला घातला होता. शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याकरिताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नवे शिक्षण धोरण लागू केले. त्यांची ही भूमिका महाराष्ट्रात पुढे घेऊन जाण्याचे मी काम करणार आहे. तसेच संसदीय कार्यमंत्री म्हणून सर्वाशी समन्वय राखण्याचा प्रयत्न करीन, असेही पाटील यांनी म्हटले आहे. वस्त्रोद्योग खात्यात अभिनव योजना राबविण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वच मंत्र्यांनी मिळालेल्या खात्यांबद्दल अधिकृतपणे समाधान व्यक्त केले. खातेवाटप रविवारी सायंकाळी करण्यात आले. सोमवारी स्वातंत्र्यदिनी सर्वच मंत्री विविध जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहणासाठी उपस्थित होते. मंगळवारी मंत्री हे खात्यांचा पदभार स्वीकारतील. बुधवारपासून सुरू होणाऱ्या सहा दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची कसोटी लागणार आहे, कारण खात्यांचा तेवढा गृहपाठ झालेला नसताना विधिमंडळाला सामोरे जावे लागणार आहे.