मुंबई:  कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडला असून सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक विकास घडविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वानी एकत्र येऊ या, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी सोमवारी येथे केले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचा ६३वा वर्धापन दिन राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) येथे आयोजित मुख्य समारंभास राज्यपालांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव मनोज सौनिक, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

 या वेळी जगभरातील मराठी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन राज्यपालांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली तसेच कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडल्याचा उल्लेख करून आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबरोबरच फुले, आंबेडकर, शाहू महाराज, लोकमान्य टिळक अशा अनेक विभूतींनी महाराष्ट्राला सामाजिकदृष्टय़ा समृद्ध केल्याचे सांगत राज्यपाल म्हणाले, शिवाजी महाराजांच्या शिवशकानुसार शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे. यानिमित्ताने २ ते ९ जून  या कालावधीमध्ये शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. तसेच किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याशिवाय पुण्यातील आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. करोनानंतर राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करून रोजगारनिर्मितीवर भर देण्यात येत आहे.

राज्यात लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत. करोनाच्या तीन लाटांचा नियोजनबद्ध रीतीने सामना करीत राज्याने देशात एक उदाहरण निर्माण केल्याचे सांगून राज्यातील जनतेने आपले आरोग्य सांभाळावे, असे आवाहनही राज्यपालांनी केले.

विविध कल्याणकारी योजना

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा वार्षिक दीड लाख रुपयांवरुन पाच लाख रुपये करण्यात आली आहे. याशिवाय नवीन २०० रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात येत आहे. राज्यात १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. मुंबईतील जी.टी. रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. ४५ विविध उद्योग आणि उद्योग समूह यांच्यासमवेत करार करून एक लाख २५ हजार रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील किमान ५०० युवकांना पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना मदत

नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत असून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेत केंद्राप्रमाणेच राज्य शासनही प्रति शेतकरी सहा हजार रुपये देणार असल्याने दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या विमा हप्तय़ाची दोन टक्के रक्कम आता शासनामार्फत भरली जाणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून नोंदणी करता येईल. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचा लाभ सुमारे १४ लाखांहून शेतकऱ्यांना मिळाल्याचे  राज्यपालांनी या वेळी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांचे हुतात्म्यांना अभिवादन

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या वेळी शिंदे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

उमेदवारांना नियुक्तिपत्रे

राज्यपाल बैस आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शासन सेवेत नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या सोहळय़ात संचलनाचा निकाल जाहीर करण्यात आला. कृषी विभागाच्या चित्ररथाने प्रथम, सांस्कृतिक कार्य विभागाने द्वितीय, तर गृह विभागाच्या (वाहतूक) चित्ररथाने तृतीय क्रमांक मिळवला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra celebrate 63rd foundation day with enthusiasm zws
Show comments