मुंबई : मुंबईमध्ये काही संस्थांनी अलिकडे केलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त संकलित झाले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत यापैकी २०-२५ टक्केच रक्ताचा वापर होणार आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेसमोर सुमारे ५० हजार युनिट रक्त टिकवण्याचे आव्हान आहे.
नेत्यांचे वाढदिवस, सामाजिक कार्यक्रम यांचे निमित्त साधून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. एका धार्मिक संस्थेने ६ ते १९ जानेवारीदरम्यान मुंबईत १ लाख ३९ हजार युनिट रक्त संकलित केले. औषध वितरकांच्या संघटनेने २५ जानेवारी रोजी रक्तदान शिबिरात ८० हजार युनिट रक्ताचे संकलन केले. अन्य छोट्या मंडळांच्या शिबिरांमध्येही रक्तसंकलन झाले आहे. हे सुमारे २ लाख २५ हजार युनिट रक्त सरकारी व खासगी रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्याला दररोज पाच हजार युनिट रक्ताची आवश्यकता असते. संकलित रक्त फक्त ३५ दिवसांपर्यंत टिकते. जास्तीचे रक्त वाया जाऊ नये म्हणून, खासगी रक्तपेढ्या ते इतर राज्यांतील रक्तपेढ्यांना विकतात. पण, सरकारी रक्तपेढ्यांना ते रक्त विकता येत नसल्यामुळे, २० ते २५ टक्के, म्हणजेच जवळपास ५० हजार युनिट रक्त वाया जाण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात गरजेपेक्षा जास्त रक्तदान शिबिरे आयोजित केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त संकलन झाले आहे. योग्य नियोजन करून रक्तदान शिबिरे आयोजित केल्यास ही समस्या उद्भवणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
एप्रिलमध्ये तुटवडा जाणवण्याची भीती
एका व्यक्तीने रक्तदान केले की, ती व्यक्ती पुढील तीन महिने रक्तदान करू शकत नाही. जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान झाल्यामुळे, या रक्तदात्यांना आता एप्रिलपर्यंत रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे एप्रिलमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवेल आणि रक्तदात्यांची कमतरता भासेल, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.