नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे जुलै-ऑगस्ट २०१५ दरम्यान होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडे १५०० कोटी रुपयांची मागणी करण्यात येणार असून अलाहाबादप्रमाणे भरीव निधी मिळावा, अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शनिवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना करणार आहेत.
कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. कुंभमेळ्यासाठी साधू व भाविक मिळून एक कोटी लोक येतील, असा अंदाज आहे. या दृष्टीने शाही स्नान, परिसरातील कामे, पाणीपुरवठा योजना, रस्ते व पूल, मलनि:सारण, कायमस्वरूपी शौचालये, विद्युत व्यवस्था आदी सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच कुंभमेळ्यासाठी येणारे विविध आखाडे तसेच धार्मिक संस्था साधुग्रामची उभारणी करण्यात येणार आहे.
मागील कुंभमेळ्यासाठी २०० एकर जागेत साधुग्राम उभारण्यात आले होते. मात्र यावेळी ही संख्या मोठी राहणार असल्याने आणखी ३२८ एकर जागा साधुग्रामसाठी आरक्षित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे घाटांची संख्याही वाढविण्यात येणार असून शहरातील बहुतांश रस्ते दुपदरी तर मोठे रस्ते चौपदरी करण्यात येणार आहेत. एकूणच कुंभमेळ्यासाठी विविध विभागांनी सरकारला ५,४८६ कोटींचे प्रस्ताव सादर केले होते. त्यामध्ये नाशिक मनपा २५०५, सार्वजनिक बांधकाम विभाग ११०१ आणि पाटबंधारे विभागाच्या ९५२ कोटींच्या प्रस्तावांचा समावेश होता.
मात्र मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २३८० कोटींच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून त्यात महापालिकेला १०५२ तर सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ६६० कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा