बेळगाव आणि सीमावर्ती भागात मोठय़ा प्रमाणावर मराठी भाषक असल्याने राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रचारासाठी सीमा भागात जाणे अपेक्षित असले तरी काँग्रेसची राजकीय अडचण नको म्हणून बंगळुरूची निवड मुद्दामहून करण्यात आली होती.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ बंगळुरूचा दौरा केला. वास्तविक मराठी भाषकांना आकर्षित करण्याकरिता चव्हाण यांचा प्रचार दौरा बेळगावमध्ये आयोजित करण्यात येणार होता. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने बेळगावमध्ये प्रचाराकरिता जाणे काँग्रेसला तसेच स्वत: मुख्यमंत्र्यांकरिता राजकीय अडचणीचे ठरले असते. यामुळेच बेळगावऐवजी मुख्यमंत्र्यांचा बंगळुरूचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला. सीमा प्रश्न अद्यापही संपलेला नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री चव्हाण यांना तेथील पत्रकार परिषदेत द्यावी लागली. अलीकडेच बेळगावमध्ये केलेल्या भाषणावरून कर्नाटक सरकारने राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

Story img Loader