राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या मंत्रालयात सध्या धूळ, घाण, चिखल व कचऱ्याचे साम्राज्य असून त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या दीड महिन्यापासून मंत्रालयात येणेच जवळपास सोडले आहे. दुरुस्तीच्या कामावर कोणाचेही नियंत्रण नसून योग्य नियोजनच नसल्याने कर्मचाऱ्यांसह सर्वानाच त्रास तर सहन करावा लागतोच, पण गंभीर दुखापत किंवा जीविताला धोका निर्माण होण्याचीही शक्यता आहे.
दुरुस्तीकाम सुरू असताना एका मजुराचा मंत्रालयात रविवारी मृत्यू झाला असताना सरकारी यंत्रणेला त्याचे कोणतेही सोयरसुतक नसून कंत्राटदार कंपनीची ती जबाबदारी आहे, अशी समजूत करून घेऊन सरकारने जबाबदारी झटकली आहे.
मंत्रालयाचे दुरुस्तीकाम गेले सात-आठ महिने सुरू असून त्याला कोणतीच शिस्त नाही. ज्या बाजूला व मजल्यावर काम सुरू असेल, तेथील ये-जा नियंत्रित करून अन्य मार्ग उपलब्ध करून द्यायला हवा होता. पण सर्व ठिकाणी अर्धवट कामे करून चिखल, धूळ, घाण वास, स्वच्छतागृहात पाणी नाही, हे चित्र आहे.  मुख्य इमारतीच्या दर्शनी भागात गेले काही दिवस काम सुरू असताना आणि खोदकामही केले असताना मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश व लोकांची येजा सुरू आहे.
वरच्या मजल्यांवरही कामांचा कोणताही धरबंद नसून डोक्यात कधी एखादा सिमेंटचा तुकडा, दगड किंवा कचरा पडेल, हे सांगता येत नाही. जीव मुठीत घेऊन कर्मचारी व नागरिकांना मंत्रालयात प्रवेश व मजल्यांवर जावे लागते. मजलानिहाय व विभागनिहाय शिस्तबद्धपणे हे काम झाल्यास कमीत कमी त्रास होईल, पण त्याकडे कोणाचेही लक्ष नाही.

मुख्यमंत्र्यांची टाळाटाळ
मुख्यमंत्री कार्यालय, दालन, मंत्रिमंडळ बैठक सभागृह यासाठी करोडो रुपये खर्च करून फर्निचर व अन्य व्यवस्था करण्यात आली. पण मंत्रालयातील त्रास व घाण पाहून मुख्यमंत्री चव्हाण मंत्रालयात येणेच टाळत आहेत. मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात त्रास होतो, मात्र अनेक मंत्री, अधिकारी व सुमारे अडीच-तीन हजार कर्मचारी यांनी तेथे काम कसे करायचे, असा सवाल आता अधिकारी खासगीत विचारत आहेत. मुख्यमंत्री दररोज मंत्रालयात आले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांच्या अडचणी व सुरू असलेल्या कामाची पाहणी केली, तर कंत्राटदार कंपनीकडून किमान शिस्त पाळली जाईल. मजुराऐवजी एखादा मंत्रालयीन कर्मचारी किंवा नागरिकाचा बळी गेला असता, तर सरकार असेच थंड राहिले असते का? अशी चर्चा उच्चपदस्थांमध्ये सुरू आहे.

Story img Loader