राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या मंत्रालयात सध्या धूळ, घाण, चिखल व कचऱ्याचे साम्राज्य असून त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या दीड महिन्यापासून मंत्रालयात येणेच जवळपास सोडले आहे. दुरुस्तीच्या कामावर कोणाचेही नियंत्रण नसून योग्य नियोजनच नसल्याने कर्मचाऱ्यांसह सर्वानाच त्रास तर सहन करावा लागतोच, पण गंभीर दुखापत किंवा जीविताला धोका निर्माण होण्याचीही शक्यता आहे.
दुरुस्तीकाम सुरू असताना एका मजुराचा मंत्रालयात रविवारी मृत्यू झाला असताना सरकारी यंत्रणेला त्याचे कोणतेही सोयरसुतक नसून कंत्राटदार कंपनीची ती जबाबदारी आहे, अशी समजूत करून घेऊन सरकारने जबाबदारी झटकली आहे.
मंत्रालयाचे दुरुस्तीकाम गेले सात-आठ महिने सुरू असून त्याला कोणतीच शिस्त नाही. ज्या बाजूला व मजल्यावर काम सुरू असेल, तेथील ये-जा नियंत्रित करून अन्य मार्ग उपलब्ध करून द्यायला हवा होता. पण सर्व ठिकाणी अर्धवट कामे करून चिखल, धूळ, घाण वास, स्वच्छतागृहात पाणी नाही, हे चित्र आहे. मुख्य इमारतीच्या दर्शनी भागात गेले काही दिवस काम सुरू असताना आणि खोदकामही केले असताना मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश व लोकांची येजा सुरू आहे.
वरच्या मजल्यांवरही कामांचा कोणताही धरबंद नसून डोक्यात कधी एखादा सिमेंटचा तुकडा, दगड किंवा कचरा पडेल, हे सांगता येत नाही. जीव मुठीत घेऊन कर्मचारी व नागरिकांना मंत्रालयात प्रवेश व मजल्यांवर जावे लागते. मजलानिहाय व विभागनिहाय शिस्तबद्धपणे हे काम झाल्यास कमीत कमी त्रास होईल, पण त्याकडे कोणाचेही लक्ष नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा