प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत राजपथावर झालेल्या ध्वजसंचलन समारंभात सामील झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘पंढरीची वारी’ या राज्याच्या चित्ररथाची सर्वोत्तम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राज्याला सहाव्यांदा प्रथम क्रमांकाचा मान मिळाला आहे.
प्रजासत्ताकदिनी पार पडलेल्या पथसंचलनाच्या निकालाची घोषणा संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी केली. महाराष्ट्राला प्रथम क्रमांक, झारखंडला दुसरा व कर्नाटक राज्याला तिसरा क्रमांक मिळाला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्याचे वैशिष्टय़ दाखविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदíशत केले जातात. पंढरीच्या वारीचा संदेश देत सामाजिक व आध्यात्मिकतेचा समावेश असलेला आगळावेगळा चित्ररथ असावा, असा विचार सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मांडला. त्यावरून माजी सांस्कृतिक संचालक आणि पुरातत्त्व विभागाचे संचालक संजय पाटील यांनी संकल्पना मांडली. प्रसिद्ध कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी त्रिमिती प्रतिकृती तयार करून ६५ कारागिरांच्या मदतीने अतिशय देखण्या चित्ररथाची उभारणी केली. मध्यभागी पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई मंदिर दाखविण्यात आले. अश्विरगण, तुळस घेतलेली स्त्री आणि संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांच्या मूर्ती दाखविण्यात आल्या होत्या. वारीत २८० वारकऱ्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या.