मुंबई : राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांचे विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरूपाचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली.

हेही वाचा >>> रवींद्र चव्हाण यांच्याकडे पक्षसंघटनेतील जबाबदारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात हवाई वाहतुकीच्या वाढीला मोठा वाव आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या उडान योजनेसह राज्याच्या निधीतून विमानतळांचा विकास, त्यांचे विस्तारीकण, धावपट्टीची लांबी वाढविणे, विमानतळांवर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे. मोठ्या शहरांतील विमानतळांवरील भार कमी करण्यासाठी राज्याच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी, शिर्डी, अमरावती (बेलोरा), पुरंदर, कराड, चंद्रपूर (मोरवा), सोलापूर, धुळे, फलटण, अकोला, गडचिरोली या विमानतळांच्या कामांच्या कार्यवाहीचा आढावादेखील घेतला. यासंदर्भातील करार लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Story img Loader