मुंबई : दिल्लीतील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखविल्यामुळे २७ वर्षानंतर दिल्ली विधानसभेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला. या निकालाच्या माध्यमातून दिल्लीकरांनी पंतप्रधानांच्या कामावर विश्वास दाखवतांनाच आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाडला आहे. भाजपा सरकार दिल्लीकरांचा अपेक्षा पूर्ण करेल असा विश्नास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या दणदणीत विजयाबद्दल बोलताना फडणवीस यांनी पुन्हा एकदा केजरीवाल यांना लक्ष्य केले. अण्णा हजारे यांचा हात पकडून पुढे आलेल्या केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन आंदोलन करीत दिल्लीची सत्ता मिळविली मात्र कालांतराने तेच भ्रष्टाचाराचे मेरूमणी ठरले. सातत्याने खोटी आश्वासने आणि जनतेची फसणूक करीत त्यांनी राज्य केले.
आज दिल्लीतील जनतेने त्यांच्या खोट्या राजकारणाचा बुरखा फाडला असून मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. हे विकासाला दिलेले मत आहे. भाजपचे सरकार लोकांच्या आशा आणि आकांक्षा निश्चितपणे पूर्ण करेल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीनंतर मोदींच्या ‘एक है तो सेफ है’च्या घोषणेला हरियाणा, महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतील जनतेनेही पाठिंबा दिल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.