प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले वजन घटवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फडणवीस यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून गेल्या तीन महिन्यात १८ किलोने वजन घटवले आहे. ‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार,  त्यावेळी त्यांचे वजन तब्बल १२२ किलो होते. त्यानंतर फडणवीसांनी संतुलित आहार, पथ्य, नियमित व्यायाम आणि आवश्यक औषधांच्या जोरावर स्वत:च वजन १०४ किलोपर्यंत कमी केले. आगामी काळात ८८ ते ९० किलोपर्यंत वजन कमी करण्याचे लक्ष्य फडणवीसांनी ठेवले आहे.
जाणून घ्या अनंत अंबानीने १८ महिन्यांत १०८ किलो वजन कसं कमी केलं?
फडणवीस यांच्या डॉक्टर जयश्री तोडणकर याबाबत बोलताना म्हणाल्या की, तब्बल दोन महिने आम्ही मुख्यमंत्र्यांची नियमित तपासणी करत होतो. त्यांची पचनक्रिया उत्तम असून वैद्यकीय उपचारांनी तिची कार्यक्षमता वाढवता येऊ शकते, हे लक्षात आल्यानंत आम्ही त्यानुसार त्यांच्यावर औषधोपचार सुरू केले. त्यामुळे त्यांचा शुगरचा त्रासही बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला. मुख्यमंत्र्यांना जास्त प्रवास करावा लागत असल्याने त्यांना बरेच श्रम पडतात. यादरम्यान, त्यांना दिवसाला १० हजार पावले चालण्याची गरज होती. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांचा हा सल्ला तंतोतंत पाळला आणि आता त्याचे परिणाम दिसत आहेत, असे तोडणकर यांनी सांगितले. याशिवाय, शारीरिक व्यायामासाठी त्यांनी मिकी मेहता यांचे मार्गदर्शन घेतले होते. मुख्यमंत्र्यांना जेमतेम चार ते पाच तासांची झोप मिळते. श्वासोच्छवासाच्या व्यायामाने अपुऱ्या झोपेचा शीण भरून काढला जातो, असे मिकी मेहता यांनी सांगितले. वर्षाअखेरीपर्यंत त्यांना फिट अॅण्ड फाईन बनविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही मेहता यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा