राज्यात अडीच वर्षांपूर्वा महाविकास आघाडीच्या निमित्ताने नवं राजकीय समीकरण पहायला मिळालं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना बंड पुकारलं आणि आणखी एक नवा राजकीय प्रयोग पहायला मिळाला. दरम्यान आता राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढणारी जवळीक पाहता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच आज हे तिन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. नुकतंच एमसीए निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार, शिंदे आणि फडणवीस एकत्र आले होते. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला वानखेडे मैदानावरील गरवारे क्लब येथे हे तिन्ही नेते सत्तांतरणानंतर पहिल्यांदाच एकत्र आले होते. यावेळी राजकीय टोलेबाजी पहायला मिळाली होती.
आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसूबारस आहे. मनसेने शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचं आयोजन केलं असून यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. दुपारी ४ वाजता एकनाथ शिंदे उद्घाटनासाठी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्यांदाच राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे त्रिकूट एकत्र दिसणार आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याबद्दल कौतुक केलं होतं. यानंतर देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचं औक्षण केलं होतं. तसंच गणेशोत्सवात एकनाथ शिंदे ‘शिवतीर्थ’वर पोहोचले होते. यावेळी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा झाली होती.
दरम्यान अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल होतं. एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झालं असल्यास आणि तिथे त्यांची पत्नी किंवा मुलगा, मुलगी निवडणूक लढत असतील तर आपला उमेदवार उभा न करण्याच्या राजकीय परंपरेची आठवण त्यांनी करुन दिली. यानंतर भाजपानेही निवडणुकीतून माघार घेत राजकीय परंपरा कायम ठेवली होती.
दरम्यान सध्या दीपोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणारं हे त्रिकूट भविष्यात राज्याच्या राजकारणातही एकत्र दिसणार का? हे पहावं लागेल