राज्यात सध्या अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत ‘वर्षा’वर चर्चेसाठी बोलावलं होतं. रविवारी रात्री तब्बल अडीच तास ही बैठक चालली. मात्र अद्यापही या वादावर तोडगा निघाला नसून वाद कायम असल्याची माहिती आहे. त्यानंतर आज दोन्ही नेते ‘सागर’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावेळी काय घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बच्चू कडू बैठकीआधी काय म्हणाले?

“आता आम्ही चर्चेला बसणार आहोत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहेत. चर्चा काय होते, समाधान काय होतं, त्यावर पुढचं ठरवलं जाईल. आमच्यावर झालेले आरोप फार गलिच्छ आणि खालच्या स्तराचे आहेत. त्यामध्ये कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर आपण पुढचा निर्णय जाहीर करु”, असं बच्चू कडू यांनी बैठकीला पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

‘मला गुवाहाटीहून परत यायचं होतं’, बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “मी तिथं जाऊन…”

“रवी राणा यांनी इतकी मोठी बदनामी केली आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागावी या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत”, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. “१ तारखेला आंदोलन होणार आहे. तोडगा निघाला नाही तर आंदोलन होणारच. कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे ते आल्यानंतर निर्णय घेऊ”, असं ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

विश्लेषण: बच्चू कडू, रवी राणांमधील संघर्ष नेमका काय आहे? त्याची बीजे कशी पेरली गेली?

“कार्यकर्त्यांचे मेसेज येत आहेत. तुमचा इतका अपमान होत आहे, तुम्ही इतकी बदनामी सहन केली, सत्ताधारीच अशा प्रकारे बदनामी करत असतील तर कशाला त्यांच्यासोबत राहायचं? असं त्यांचं म्हणणं आहे. ते बरोबरच आहे. त्यांचं म्हणणं काही चुकीचं नाही”, असं बच्चू कडूंनी सांगितलं. “राणांमुळे एवढी बदनामी झाली तरी सरकार का फिदा आहे ते माहिती नाही”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका

“राणा आणि कडू यांच्यात वाद नसून तो गैरसमज आहे. आम्ही तो गैरसमज दूर करु. ५० खोके बोलणं चुकीचं आहे. कुठेतरी २७ कोटी पकडले तर एक ट्रक लागला, म्हणजे ५० कोटींना दोन ट्रक लागतील. मग ५० आमदारांच्या ५० कोटींना किती ट्रक लागतील याचा विचार करा. ते ट्रक कुठे आहेत? मी कोणालाही पैसे दिलेले नाहीत. सगळे स्वत:हून माझ्यासोबत आले आहेत,” असं एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितलं.

पण नेमका वाद काय?

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाक् युद्ध सुरू आहे. रवी राणांनी बच्चू कडूंवर केलेल्या आरोपानंतर या वादाला सुरुवात झाली. बच्चू कडू यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. यानंतर बच्चू कडू यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं असून ‘येत्या १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्या, अन्यथा परिणामांची तयारी ठेवा’ असं आव्हानच दिलं आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यात अचलपूर मतदार संघातील एका दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात रवी राणांनी बच्चू कडू यांना डिवचलं होतं. ‘मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या… हे या मतदार संघातल्या आमदाराचे ‘स्लोगन’ आहे,’ अशी टीका त्यांनी केली होती. मेळघाटातील धारणी येथेही त्यांनी बच्चू कडूंना पुन्हा डिवचले. त्याला प्रत्यूत्तर देताना बच्चू कडूंनी रवी राणांविषयी असंसदीय शब्दांचा वापर केला आणि त्यानंतर हा वाद चांगलाच वाढत गेला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm eknath shinde meets independent mla bachchu kadu ravi rana over conflict sgy