लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई आणि परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेने विविध प्रयोग हाती घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत कृत्रिम पावसाचा प्रयोग, पाणी फवारण्यासाठी एक हजार टँकरचा पुरवठा करण्यासह अनेक सूचना केल्या. तर शहरात प्रवेश करणाऱ्या गाड्यांमुळे धूळ पसरत असल्याचा दावा करीत प्रवेशद्वारांवर चाके धुण्याचा प्रयोग पालिका करणार आहे.
मुंबईतील प्रदूषणावरून उच्च न्यायालयाने महापालिकेसह संबंधित यंत्रणांना फटकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी या विषयावर बैठक घेतली. बैठकीला मुख्य सचिव मनोज सौनिक, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन उपस्थित होते. याखेरीज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक सूचना केल्या. उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका व विविध सरकारी यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच नागरिकांना प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी आवश्यकतेनुसार कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शहरात प्रदूषण कमी करण्याबाबच्या उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी सुरू झाली असली तरी पावसामुळे हवेची गुणवत्ता काहीशी सुधारल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. मात्र प्रदूषणात पुन्हा वाढ झाल्यास ट्रक तसेच अवजड वाहनांना बंदी, धूर सोडणाऱ्या वाहनांवर कारवाई, सम-विषम पद्धतीने वाहनांना रस्त्यावर आणण्याची परवानगी यासारख्या उपाययोजना आयआयटीच्या तज्ज्ञांनी सुचविल्या आहेत.
हेही वाचा >>> मुंबईत येण्यापूर्वी गाडय़ांची चाके धुणार! प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेचा नवा प्रयोग
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. दिल्लीमध्ये ‘क्लाऊड सिडिंग’ होणार असून त्याला यश आल्यास मुंबईतही त्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती चहल यांनी पत्रकार परिषदेत दिली. याखेरीज महापालिकेने अन्य उपाययोजना सुरू केल्या असून त्याचा एक भाग म्हणून बाहेरून शहरात येणाऱ्या वाहनांची चाके धुण्यासाठी शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवर ‘वॉटर जेट स्प्रे मशीन’ बसवण्यात येणार असल्याचे चहल यांनी सांगितले. त्यासाठी गाड्या थांबवण्याची गरज भासणार नाही. चालत्या गाड्यांच्या चाकांवरच पाणी फवारले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे धूळ कमी करण्यासाठी दररोज ६५० किमी रस्ते धुण्यात येणार असून आगामी काळात १००० किमी रस्ते धुण्यासाठी नियोजन केले जाणार असल्याचे ते म्हणाले. कचरा जाळण्याच्या घटना घडू नयेत कचराभूमीवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्याचे चहल यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या सूचना
रस्ते पाण्याने स्वच्छ करा. साचलेली धूळ साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करा.
●रस्ते धुण्यासाठी टँकरची संख्या एक हजारपर्यंत वाढवा.
●विकासकामांच्या ठिकाणी धूळ रोखण्यासाठी पत्रे लावा.
●शहरातील सर्वाधिक प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांवर नियंत्रण ठेवा.
●माती, राडारोडा झाकून वाहतूक होत नसेल तर कारवाई करा.
●महानगरांमध्ये नागरी वनक्षेत्र (मियावाकी) वाढविण्यासाठी पुढाकार घ्या.
●प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा दर आठवड्याला सादर करा.