केंद्रातील काँग्रेसप्रणित सरकारच्या काळात घोटाळे अधिक झाले, असा आरोप करणारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट आव्हानच दिले. हजारो वर्षांत झाला नसेल, एवढा देशाचा विकास यूपीए सरकारच्या काळात २००४ पासून झाल्याचा छातीठोक दावा करीत मुख्यमंत्री चव्हाण यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.  
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी दोन वर्षांंच्या कालावधीत केलेल्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘प्रवास’ स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, वनेमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यासह पक्षाचे अनेक नेते याप्रसंगी उपस्थित होते.
भाजपने काँग्रेस सरकारच्या काळातील घोटाळे आणि भ्रष्टाचारावर तोफ डागली असतानाच काँग्रेसच्या वतीने बचावासाठी मुख्यमंत्री चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. यूपीए सरकारच्या काळात झाला तेवढा विकास कधीच झाला नाही हे आपले म्हणणे अर्थतज्ज्ञही मान्य करतील. देशाचा विकासाचा दर लक्षात घेता एवढा विकास कधीच साधला गेला नव्हता हे आपले म्हणणे खोडून काढण्याचे आव्हानच त्यांनी दिले. ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम इंदिरा गांधी यांनी राबविला. पण दुर्दैवाने अद्यापही गरिबी दूर होऊ शकली नाही. यूपीए सरकारने माहितीचा अधिकार आणून कारभारात पारदर्शकता आणली. विविध घटकांच्या विकासासाठी विविध कार्यक्रम राबविल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राहुल गांधी यांनी पक्षात नेमणुका करण्याऐवजी निवडणुकांच्या माध्यमातून निवड करण्याची पद्धत लागू केली त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. पक्षात यापुढे कामगिरीच्या आधारेच पदे आणि उमेदवाऱ्या दिल्या जातील, असेही चव्हाण यांनी सांगितले.
राज्यात काँग्रेसची परिस्थिती चांगली असताना राष्ट्रवादीबरोबर आघाडीची गरज का भासते, असा मुद्दा अ. भा. युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव यांनी केला होता. हाच धागा पकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी, पक्ष वाढविण्यासाठी कोणी आपल्याला रोखले आहे, असा सवाल केला. काही जिल्ह्यांमध्ये पक्षाची परिस्थिती फारच कमकुवत आहे. ही परिस्थिती सुधारली पाहिजे, असे मत अशोकरावांनी मांडले. दोन वर्षांंची कारकीर्द पूर्ण झाली तरी चांगले काम केल्याने विश्वजित कदम यांना आणखी संधी मिळेल, असे संकेत सातव यांनी दिले.

Story img Loader