राज्य सहकारी बँक आणि सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीची धोबीपछाड करणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीने आता ‘आदर्श’ चौकशी अहवाल फेटाळण्याच्या निर्णयाचा आधार घेतला आहे. मंत्रिमंडळाचे प्रमुख हे मुख्यमंत्री असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा अहवाल फेटाळण्याच्या निर्णयाचे सारे खापर मुख्यमंत्र्यांवर गुरुवारी फोडले.
‘आदर्श’ चौकशीचा अहवाल फेटाळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. मंत्रिमंडळाचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्र्यांनी तसा निर्णय बहुधा आधीच घेतला होता, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेत जुने उट्टे काढले. अजित पवार यांना शह देण्याकरिताच सिंचन घोटाळ्याची कागदपत्रे मुद्दामहून बाहेर पुरविली गेल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. त्यांचा सारा रोख अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या दिशेने होता. संधी मिळताच अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याची खेळी केली आहे.
‘आदर्श’चे सारेच प्रकरण दु:खद आणि दुर्दैवी असल्याचे मतप्रदर्शन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यांच्या मनाचे समाधान व्हावे अशी आमचीही इच्छा असून, फेटाळलेला अहवाल पुन्हा स्वीकृत करण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीचा त्याला पाठिंबा राहिल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाचा एखादा निर्णय चुकीचा किंवा अयोग्य वाटल्यास त्यात दुरुस्ती करण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार असतो, अशी मल्लीनथीही त्यांनी केली. सुनील तटकरे व राजेश टोपे या पक्षाच्या दोन तत्कालीन मंत्र्यांवर ताशेरे ओढण्यात आलेला नाहीत. फक्त त्यांनी बैठका घेतल्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. तटकरे, टोपे यांच्यासह सदनिका असलेल्या जितेंद्र आव्हाड यांना पक्षाने क्लिनचिट दिली.
केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनीही अहवाल फेटाळण्याच्या कृतीबद्दल विरोधी मत व्यक्त केले. निर्णय घेण्यापूर्वी तो विचाराअंती घ्यावा, टीका झाल्यावर त्यात बदल करू नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादीने व्यक्त केली. मागे राहुल गांधी यांनी विरोध करताच वटहुकूम मागे घेण्यात आला होता. हे सारेच अयोग्य असल्याची प्रतिक्रिया मलिक यांनी व्यक्त केली.
‘राज आणि अमिताभ दोघेही संधीसाधू!’
राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन हे दोघे कार्यक्रमात एकत्र आले असले तरी दोघांमधील ही नुराकुस्ती होती. या दोघांमध्ये मॅचफिक्सिंग होते. दोघांनाही जनतेची दिशाभूल केली असून, राज ठाकरे आणि अमिताभ बच्चव दोघेही संधीसाधू असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली. नुराकुस्तीमध्ये निकाल आधीच ठरलेला असतो, तसेच हे सारे आहे. हे दोघेही चांगले नेते आणि अभिनेते आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला.
भाजप नेत्याच्या नऊ बेनामी सदनिका
भाजपचे खासदार अजय संचेती यांच्या नातेवाईकांच्या नावे नऊ बेनामी सदनिका असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. संचेती यांचे भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. संचेती यांनी भाजपच्या कोणत्या नेत्यांना सदनिका दिल्या हे बाहेर आले पाहिजे, अशी मागणीही मलिक यांनी केली.