मुंबई : ‘प्रबोधनकार नास्तिक नव्हते, परंतु धर्माच्या नावावर चालणाऱ्या भोंदूगिरीवर त्यांचा विश्वास नव्हता. म्हणूनच आपल्या लेखणीतून, कामातून त्यांनी अशा धार्मिक ढोंगीपणावर कायम लाथ मारली. त्यांचे हे जे काही विचारांचे धन आहे, ते आमच्याही रक्तात आले आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या वैचारिक वारशाविषयी अभिमान व्यक्त के ला. तसेच, महाराष्ट्राची परंपरा ही एकत्रितपणाची भावना रुजविणारी होती. परंतु सध्या काही मंडळी नवहिंदू म्हणून जे काही करत आहेत तेच हिंदुत्वाला घातक आहे, असे फटकारे त्यांनी भाजपचा उल्लेख टाळत लगावले.
मराठी भाषा विभागांतर्गत येणाऱ्या ‘महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळा’च्या ‘प्रबोधन’मधील ‘प्रबोधनकार’ या त्रिखंडात्मक लेखसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्य़ाद्री अतिथीगृहावर झाले. प्रबोधनकारांनी १०० वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकातील लेखांचा हा संग्रह आहे.
‘आजोबांनी १०० वर्षांपूर्वी आपल्या विचारांची जी बीजे पेरली, त्यांनाच पुढील तीन पिढय़ांच्या रूपाने वेगवेगळ्या विचारधारांच्या रूपाने फांद्या फुटल्या आहेत. पण मूळ विचार तोच आहे,’ हे उलगडताना मुख्यमंत्र्यांनी पितृपक्ष आणि त्या भोवती असलेल्या समजुतींचा दाखला दिला. ते म्हणाले, ‘आज जेव्हा कुणी मला पितृपक्षात अमुक हे काम करायचे का? असे विचारतो तेव्हा मी त्याला म्हणतो, काय हरकत आहे? माझा पक्षच ‘पितृपक्ष’ आहे. वडिलांनी स्थापन केलेल्या या पक्षात कोणतेही नवे काम करायला अडचण कशी येणार ?’ ‘प्रबोधनकार हे आपल्या लेखणीतून तळपत्या सूर्याप्रमाणे महाराष्ट्राच्या क्षितिजावर प्रबोधनाचा प्रकाश पसरवत होते,’ अशा शब्दांत मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी प्रबोधनकारांचे काम अधोरेखित केले. प्रबोधनकारांच्या २४८ लेखांमुळे जवळपास १,५३५ पानांचा मोठे संदर्भमूल्य या निमित्ताने अभ्यासकांसाठी उपलब्ध झाले आहे,’ अशा शब्दांत संपादक सचिन परब यांनी या खंडाचे महत्त्व सांगितले.