मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई केली़ या कंपनीच्या मालकीच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर ‘ईडी’ने टाच आणली असून, ही मालमत्ता ६ कोटी ४५ लाखांची आह़े.
पुष्पक बुलियन प्रकरणात ‘ईडी’ने ही कारवाई केली आह़े. याआधी ‘ईडी’ने ६ मार्च २०१७ रोजी पुष्पक बुलियन व समूह कंपन्यांविरोधात गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने पुष्पक बुलियनच्या २१ कोटी ४६ लाख रुपये किमतीच्या मालमत्तांवर टांच आणली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. या कंपनीशी ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा व्यवहार झाल्याचे ‘ईडी’च्या निदर्शनास आले. त्यानंतर या कंपनीच्या मालकीच्या मालमत्तेवर टांच आणण्यात आली.
पुष्पक समूह महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आहे. पुष्पक रियल्टीमध्ये गुंतवलेली रक्कम महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदीच्या माध्यमातून काढून घेतल्याचे या प्रकरणाच्या तपासादरम्यान उघडकीस आले. मेसर्स पुष्पक रियल्टी डेव्हलपरने विक्रीच्या नावाखाली २० कोटी दोन लाख रुपये नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांना दिले. अनेक बनावट कंपन्या चालवणाऱ्या नंदकिशोर चतुर्वेदी यांनी पुढे मेसर्स हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. या कंपनीला ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम विनातारण (असुरक्षित) कर्जस्वरूपात दिली. अशा पद्धतीने गैरव्यवहारातील रकमेचा श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीच्या गृहप्रकल्पात वापर झाल्याचे ‘ईडी’कडून सांगण्यात आले.
पुष्पक बुलियन प्रकरण काय आहे?
नोटाबंदीच्या काळात २८५ किलो सोन्याची खरेदी केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २०१७ मध्ये पुष्पक बुलियनविरोधात गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्स प्रा. लिमिटेड कंपनीचे चंद्रकांत पटेल यांनी नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ या नोटाबंदीच्या काळात मोठय़ा प्रमाणात सोने खरेदी केले होते. त्याची किंमत ८४ कोटी रुपयांच्या आसपास आहे. या प्रकरणाच्या तपासात पीहू गोल्ड आणि साटम ज्वेलर्स यांच्या खात्यामध्ये ४१ दिवसांत मोठय़ा प्रमाणात रक्कम जमा केल्याचे उघड झाले होते. पुष्पक बुलियन्सचे खाते बँकेने ‘नॉन प्रॉफिट असेट्स’ म्हणून जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर या खात्यातून व्यवहार झाल्याचा आरोप आहे.