मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून ‘जलजीवन मिशन’ची घोषणा केली. तसेच २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल. असे जाहीर केले होते. आता २०२५ उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिनींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिनींचे बळी घेत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केला.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील पाणीटंचाईवरून सपकाळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. ‘हर घर नल आणि हर नल जल’ असे नरेंद्र मोदी सातत्याने सांगत होते. यासाठी केंद्र व राज्य सरकारने ‘जलजीवन मिशन’ योजना सुरू केली, पण या योजनेचा फायदा फक्त अधिकारी आणि कंत्रादारांनाच झाला. माता-भगिनींना पाण्यासाठी संघर्षच करावा लागत आहे, असे सपकाळ यांनी अधोरेखित केले.
हिंदी सक्तीमागे मोठे षड्यंत्र…
पहिलीपासून हिंदीची सक्ती करणे हे एक मोठे षड्यंत्र आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती संपवण्यासाठीच हिंदी लादली जात आहे. हिंदीची सक्ती अगोदर गुजरातमध्ये करावी, असे आव्हान सपकाळ यांनी दिले. पहिलीच्या वर्गापासून तीन भाषा सक्तीच्या करणे हे अशास्त्रीय आहे त्याचा भार विद्यार्थ्यांना झेपेल का? सरकारने याचा काही विचार केलेला नाही, असेही सपकाळ म्हणाले.