कामगारमंत्री भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त करणारे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश यांना दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशाराच काँग्रेसने रविवारी दिला.
जागावाटपात ज्या पक्षाच्या वाटय़ाला जो मतदारसंघ येईल तेथे त्या पक्षाचाच उमेदवार लढेल. कोणाला काही वाटले म्हणून पक्षादेश धाब्यावर बसवून निवडणूक लढविता येणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नीलेश राणे यांना दिला. राष्ट्रवादीनेही नीलेश राणे यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. गुहागरची जागा ही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. काँग्रेसचा माजी खासदार अपक्ष लढविण्याचे कसे काय जाहीर करतो, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.
मुलांमुळेच नारायण राणे हे राजकीयदृष्टय़ा अडचणीत येतात, असे बोलले जाते. राणे यांच्या मुलांच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळेच कोकणात राणे यांचे एकापाठोपाठ एक समर्थक सोडून गेले वा जात आहेत. राणे यांची नाराजी दूर करताना नितेश यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय प्रचार समितीचे प्रमुखपदही राणे यांच्याकडे सोपविण्यात आले.
काँग्रेसच्या मुलाखती सुरू
पक्षाने २००९ मध्ये लढविलेल्या १७४ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू केली. पहिल्या टप्प्यात विदर्भातील ६२ पैकी काँग्रेसकडे असलेल्या ४९ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, शिवाजीराव देशमुख, कृपाशंकर सिंग, राजीव सातव आदींनी मुलाखती घेतल्या. विद्यमान आमदारांच्या अन्य इच्छुकांबरोबर मुलाखती घेण्यात आल्या नाहीत. त्यांना स्वतंत्र वेळ देण्यात येत आहे. महिला कार्यकर्त्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळावे म्हणून महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही काळ घोषणाबाजी केली.
आघाडीचा निर्णय अद्याप नाही
आघाडी कायम असल्याचा निर्वाळा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिला असला तरी अद्याप आघाडीचा अधिकृतपणे निर्णयच झालेला नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी सांगितले. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्याप राज्यातील नेत्यांना काही कळविलेले नाही. राष्ट्रवादीच्या निम्म्या जागांची मागणी मान्य करता येणार नाही, याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला.