पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण झाले, आता कोण? असा साहजिकच प्रश्न काँग्रेस नेत्यांना सतावू लागला आहे. कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याचे टाळणारे राहुल गांधी सरकारच्या कारभाराबाबत करीत असलेल्या मतप्रदर्शनांमुळे नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.
आतापर्यंत पक्ष नेतृत्वाकडून अडचणीत सापडलेल्या नेत्यांना संरक्षण किंवा त्यांच्या पाठीशी उभे राहात असे. अगदीच टोकाशी आल्यास राजीनामा देण्यास भाग पाडून नंतर पुनर्वसन केले जायचे. ही पद्धत आतापर्यंत सुरू होती. अगदी गेल्या वर्षी न्यायालयाने ताशेरे ओढल्यावरही विरभद्र सिंग यांच्याकडे हिमाचल प्रदेश निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली, सत्ता येताच त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले. राहुल गांधी यांची मात्र काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. ही बाब जुन्या काँग्रेस नेत्यांच्या पचनी पडणे कठीण जात आहे. राहुल गांधी यांनी पक्षात आणलेल्या नव्या कार्यपद्धतीमुळे पक्षाला कोठे चांगले यश मिळाले असेही झालेले नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया एका नेत्याने व्यक्त केली. राहुल गांधी यांनी लक्ष घातले आणि तेथे सत्ता मिळाली, अशी जादुची कांडीही फिरत नाही याकडेही लक्ष वेधण्यात येते.
पंतप्रधान परदेशात दौऱ्यावर असताना सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात नुसते मतप्रदर्शन केले नाही तर तो निर्णय फाडून टाकण्यासारखा असल्याचे सांगितले. पक्ष नेतृत्वाशी एकनिष्ठ असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचाही त्यांनी पंतप्रधानांप्रमाणेच अवमान केला. जुन्या नेत्यांना दूर करून आपली स्वत:ची फळी उभी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यातूनच लोकसभेसाठी राज्यनिहाय आढावा घेण्याचे काम त्यांनी आपल्या विश्वासातील मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे सोपविले आहे.
दौऱ्यांत स्थानिक नेत्यांना राहुल गांधी विश्वासात घेत नाहीत ही बाब नेतेमंडळींना खटकते. यावरून मागे शरद पवार यांनी राहुल यांच्यावर टीकाटिप्पणीही केली होती. राहुल कधी आणि कोणता निर्णय घेतील हे सांगता येत नाही, अशीच पक्षात प्रतिक्रिया आहे.
आंध्रच्या मुख्यमंत्र्याचे आव्हान
तेलंगणा राज्याच्या निर्मितीच्या निर्णयावरून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी हे काँग्रेस नेतृत्वावर संतप्त झाले आहेत. काँग्रेसशासीत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राहुल गांधी यांचे निकटवर्तीय केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश आणि रेड्डी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. तेव्हा रेड्डी यांनी राहुल यांच्या समक्ष जयराम रमेश यांना चांगलेच सुनावल्याचे सांगण्यात येते. राहुल यांच्या पत्रकार परिषदेला सर्व मुख्यमंत्री उपस्थित असताना रेड्डी मात्र फिरकले नाहीत.