मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने पराभूत कोण होणार याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. महायुतीने ९ तर महाविकास आघाडीने तिन्ही जागा जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला लावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी माघार घेण्याची मुदत आज संपली. या मुदतीत कोणीच माघार न घेतल्याने १२ तारखेला मतदान होणार हे निश्चित झाले. महायुतीने ९ तर महाविकास आघाडीने तीन उमेदवार उभे केल्याने ‘१२वा’ म्हणजेच पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच विधान भवनात कुजबूज सुरू झाली. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २३ मतांची आवश्यकता आहे. काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही पक्षाकडे उभे केलेल्या उमेदवारांना स्वबळावर निवडून आणण्याएवढी मते नाहीत. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही निवडणूक होत असल्याने ‘लक्ष्मीदर्शना’ची संधी मिळणार आहे.

हेही वाचा >>> शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी विशेष जनसुरक्षा कायदा

भाजपचे पाच उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे १०३ आमदार आहेत. अपक्ष व छोट्या पक्षांच्या मदतीने पाचही उमेदवार निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पाचवा उमेदवार निवडून आणण्याकरिता भाजपला १२ मतांची आवश्यकता असेल. काँग्रेसचे ३७ आमदार असल्याने पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांना निवडून येण्यात काहीच अडचण वाटत नाही. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आणण्याकरिता मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. शेकापचे जयंत पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा आहे. त्यांनाही अपक्ष व छोट्या पक्षांच्या मतांची आवश्यकता असेल. शिवसेना ठाकरे गटाकडे १५ मते असली तरी पक्षाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनाही अन्य पक्षांची मते मिळवावी लागतील.

अजित पवार गटाचा दुसरा उमेदवार अडचणीत?

शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर व शेकापचे जयंत पाटील यांचा सारी भिस्त ही काँग्रेसच्या अतिरिक्त मतांबरोबरच काँग्रेसच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवर आहे. लोकसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत अजित पवार यांना धडा शिकविण्याची शरद पवारांची योजना आहे. मतांची मोठ्या प्रमाणावर फाटाफूट होण्याची शक्यता असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा दुसरा उमेदवार अडचणीत येऊ शकतो, अशी कुजबूज आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra council election none of 12 candidates withdraw nominations for mlc polls zws
Show comments