मुंबई : पेसा अंतर्गत विविध जिल्ह्यातील रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण करा, धनगर समाजाची आदिवासी आरक्षणातील घुसखोरी थांबवून अधिसंख्य पदे भरावीत आदी मागण्यांसाठी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खुद्द विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह चार आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या घेतल्या. मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करीत आणि पत्रके भिरकावत या आमदारांनी त्यांचा निषेध नोंदवल्याने मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी तत्काळ धाव घेत या आमदारांना जाळीवरून सुरक्षितरीत्या बाहेर काढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> महिला सशक्तीकरण अभियानास उपस्थिती

मागील आठवड्यात सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या आदिवासी आमदारांना ताटकळावे लागले. शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने हे आमदार पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आले. मात्र, भेट न मिळाल्याने संतप्त झालेले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, राष्ट्रवादीचे (अजित पवार) किरण लहामटे (अकोले), भाजप खासदार हेमंत सावरा (पालघर), काँग्रेसचे हिरामण खोसकर (इगतपुरी), बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील (बोईसर) या आमदारांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर उड्या मारून आंदोलन केले.

पोलिसांनी जाळीवर उतरलेल्या सर्व आमदारांना सुरक्षितपणे बाहेर काढले. मात्र, या आमदारांनी दुसऱ्या मजल्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. सातव्या मजल्यावर सुरू असलेली मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मंत्री गिरीश महाजन आणि अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन दुसऱ्या मजल्यावर आले आणि झिरवाळ यांच्यासह या आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नेले. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळाल्याने या आमदारांनी आंदोलन मागे घेतले. बैठकीविषयीची माहिती माजी खासदार राजेंद्र गावीत यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra deputy speaker mlas jump into safety net at mantralaya print politics news zws