मुंबई / ठाणे : दक्षिण आफ्रिकेहून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत आलेल्या डोंबिवलीतील एका नागरिकाला ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग असल्याचे शनिवारी निष्पन्न झाले. ‘ओमायक्रॉन’चा महाराष्ट्रातील हा पहिला, तर देशातील चौथा रुग्ण आहे.
‘ओमायक्रॉन’चे पहिले दोन रुग्ण कर्नाटकात आढळले होते, तर तिसरा बाधित शनिवारी गुजरातमध्ये आढळला. आता चौथा रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ‘ओमायक्रॉन’चा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळल्याची माहिती राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी ‘पीटीआय’ला दिली. या प्रवाशाने लशीची एकही मात्रा घेतलेली नाही. तरीही त्याला परदेश प्रवासाची मुभा कशी दिली गेली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
डोंबिवलीत आढळलेला हा ३३ वर्षीय रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईत आला होता. त्याला ताप असल्याने चाचणी केली असता तो करोनाबाधित आढळला. त्यानंतर त्याचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारण चाचणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल शनिवारी आला असून त्यामध्ये त्याला ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झाल्याचे आढळले. या रुग्णाला सौम्य लक्षणे आहेत. सध्या तो डोंबिवली येथील करोना केंद्रामध्ये उपचार घेत आहे. त्याच्या अगदी जवळून संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या १२ जणांचा आणि कमी जोखमीच्या २३ जणांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्या चाचण्याही करण्यात आल्या आहेत. त्याच्या संपर्कातील व्यक्तींना संसर्ग झाला नसल्याचे सांगण्यात आले.
या रुग्णाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्यातील त्याच्या २५ सहप्रवाशांचीही तपासणी करण्यात आली असून यापैकी कोणालाही करोना नसल्याचे आढळले. याव्यतिरिक्त त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांचाही शोध घेण्यात येत आहे. डोंबिवलीचा रहिवासी असलेला हा रुग्ण व्यापारी नौदलामध्ये अभियंता असून कामानिमित्ताने केपटाऊनला गेला होता.
पुण्यातील रुग्णाला डेल्टा
झांबियातून पुण्यात आलेल्या ६० वर्षीय रुग्णाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला आहे. या रुग्णाला ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले. त्याला ‘डेल्टा’ने बाधित असल्याचे सांगण्यात आले.
आठ प्रवासी करोनाबाधित
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळपर्यंत अतिजोखमीच्या देशांतून आलेल्या सर्व ३,८३९ प्रवाशांची, तर इतर देशांमधून आलेल्या १७,१०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबरपासून आतापर्यंत आठ प्रवासी करोनाबाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेदेखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. मुंबईत शनिवारी आणखी एक परदेशातून आलेला प्रवासी करोनाबाधित आढळला आहे. त्यामुळे आता शहरातील करोनाबाधित प्रवाशांची संख्या १३ झाली असून त्यांच्या सहवासातील अन्य चार जणही बाधित आढळले आहेत. एकूण १७ जणांचे अहवाल जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
‘कस्तुरबा’तील अहवाल प्रलंबित
डोंबिवलीतील ओमायक्रॉनच्या या रुग्णासह अन्य देशांतून आलेल्या १६ करोनाबाधित प्रवाशांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात गेल्या आठवडय़ात दिले होते. त्यांचे अहवाल रविवारी किंवा सोमवारी मिळणे अपेक्षित आहे. डोंबिवलीतील रुग्णाला ओमायक्रॉनच्या संसर्ग झाल्याचे पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविलेल्या नमुन्यांमध्ये आढळले आहे.
दरम्यान, देशात ‘ओमायक्रॉन’चे पहिले दोन रुग्ण शुक्रवारी कर्नाटकात आढळले होते. त्यानंतर शनिवारी गुजरातमध्ये तिसरा रुग्ण आढळला. गुजरातमध्ये आढळलेला रुग्ण २८ नोव्हेंबरला झिम्बाब्वेहून जामनगरला आला होता. त्याचे नमुने २ डिसेंबरला जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आले होते. त्यातून त्याला ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले, असे गुजरातचे आरोग्य आयुक्त जयप्रकाश शिव्हरे यांनी सांगितले.
मूळचा जामनगरचा असलेला हा रुग्ण गेल्या अनेक वर्षांपासून झिम्बाब्वेत राहत आहे. तो आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी जामनगरला आला आहे. हा रुग्ण करोनाबाधित आढळल्यानंतर त्याच्या नमुन्याची जनुकीय क्रमनिर्धारण चाचणी करण्यात आली.
प्रथम संपूर्ण लसीकरण आवश्यक!
नवी दिल्ली : लोकसंख्येच्या एका मोठय़ा भागाला अद्याप लस संरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे भारताने प्रथम दोन्ही लसमात्रा देण्यासप्राधान्य द्यावे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. ४० वर्षांवरील नागरिकांना वर्धक लसमात्रा देण्याची शिफारस शुक्रवारी शास्त्रज्ञांच्या चमूने सरकारला केली होती. त्या अनुषंगाने आधी सर्वाचे लसीकरण करण्याचे लक्ष्य गाठावे, असे प्रसिद्ध शास्त्रज्ञ विनीता बाळ यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले.
करोना रुग्णवाढीबद्दल राज्यांना केंद्राचे निर्देश
नवी दिल्ली : करोना रुग्णांचा साप्ताहिक मृत्युदर आणि बाधितांचे साप्ताहिक प्रमाण वाढत असल्याने केंद्र सरकारने शनिवार काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक ती प्रतिबंधात्मक पावले उचलण्याचे निर्देश दिले. त्यात कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, ओदिशा आणि मिझोराम यांचा समावेश आहे. चाचणी, रुग्णशोध, उपचार लसीकरण आणि करोना नियमावलीचे पालन या पंचसूत्रीचा अवलंब करावा, असे केंद्राने कळवले आहे.
भीती नको, दक्षता आवश्यक!
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत भीती बाळगू नये. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि लशीच्या दोन्ही मात्रा घ्याव्यात. तसेच मागील महिनाभरात परदेशातून आलेल्या प्रवाशांनी आपली माहिती स्थानिक आरोग्य यंत्रणेस द्यावी, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे.
गुजरातमध्ये देशातील तिसरा रुग्ण :
झिम्बाब्वेहून जामनगरला आलेल्या एका ७२ वर्षीय पुरुषाला ‘ओमायक्रॉन’ या उत्परिवर्तित करोना विषाणूचा संसर्ग असल्याचे शनिवारी निष्पन्न झाले. कर्नाटकात दोन, त्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्रात एक रुग्ण आढळल्याने देशातील ‘ओमायक्रॉन’ रुग्णांची संख्या चार झाली आहे.
ठाण्यात परदेशातून आलेल्या दहा जणांना करोना संसर्ग
’ठाणे / कल्याण : ठाणे शहरात आठ दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्या चार नागरिकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे शनिवारी निष्पन्न झाले. ’या रुग्णाचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. ठाणे शहरात २८ नोव्हेंबर रोजी तिघेजण नेदरलँडस येथून, तर एकजण कॅनडातून आला होता.
’कल्याण डोंबिवलीत गेल्या दहा दिवसांत नायजेरियातून आलेले चार आणि रशिया, नेपाळमधून आलेला प्रत्येकी एक, असे सहा जण करोनाबाधित आढळले आहेत. त्यांना पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
लस मूल्यांकनाची शिफारस
‘ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर करोना लशीच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्याची आणि वर्धक मात्रा देण्याबाबत आणखी संशोधन करण्याची शिफारस संसदीय स्थायी समितीने केंद्राला केली आहे. दुसऱ्या करोना लाटेत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सरकारी उपाययोजना अपुऱ्या ठरल्या. त्यामुळे आता आरोग्यविषयक पायाभूत सुविधा मजबूत कराव्यात, असे या अहवालात सुचवले आहे.