मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून ४ मे रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. गृहमंत्र्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये असा इशारा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“गृहमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र पोलीस दल कायदा सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहेत. आमची पूर्ण तयारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये यासाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत. याआधी समाजकंठक, गुन्हेगार स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे,” अशी माहिती रजनीश सेठ यांनी दिली.

बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंना पोलिसांची नोटीस; सरदेसाई म्हणतात, “अशा नोटिसा…!”

“सामाजिक एकोपा राखण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. एसआरपीएफ, होमगार्ड मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणं पोलिसांची जबाबदारी आहे. कोणीही ते बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. राज्यात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं असं मी राज्यातील जनतेला आवाहन करतो,” असंही ते म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील भाषणासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी भाषणाचा अभ्यास केला आहे. त्यासंबंधी आवश्यक ती कारवाई करण्यासाठी ते सक्षम आहेत. जी कारवाई करायची आहे ते ती करतील”.

“कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून नोटीस पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत,” असं रजनीश सेठ यांनी सांगितलं.

१५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती रजनीश सेठ यांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra dgp rajnish seth press conference mns raj thackeray ultimatum masjid loudspeaker sgy