राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असेल तर तो अजिबात खपवून घेणार नाही, असं मत व्यक्त केले आहे. तसेच टीईटी परीक्षेतील गैरव्यवहारातील दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याच्या बातम्यांनंतर ट्वीट करत आपली भूमिका मांडली. यात त्यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत केल्याचंही नमूद केलं आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, “मी टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणाबाबतची बातमी पाहिली. यानंतर मी शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मला हे सांगायचं आहे की कुणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. यात कुणाचीही परवा केली जाणार नाही. जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
“दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी लागेल ती मदत करणार”
“दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी जी काही मदत शालेय शिक्षण विभागाच्या वतीने लागेल ती मदत केली जाईल. शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णाजी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीद्वारे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. याचा अहवाल काही दिवसांतच सादर केला जाईल. कायदेशीर प्रक्रियेत आवश्यक ते सहकार्य शालेय शिक्षण विभागाकडून केले जाईल,” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
याशिवाय कुणाचीही हयगय केली जाणार नाही. ज्यांनी या गैरव्यवहारात सहभाग घेतला असेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा वर्षा गायकवाड यांनी दिलाय.