निवडणुका जवळ येऊ लागल्या तसे राजकीय वर्तुळात एकमेकांवर कुरघोडय़ा करण्याबरोबरच शिळ्या कढीला ऊत देण्याचे प्रयत्न सुरू झाले. मनसेवरून राष्ट्रवादीने भाजप व शिवसेनेत अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताच काँग्रेसनेही राष्ट्रवादीला आघाडीच्या धर्माची आठवण करून दिली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकारण तापू लागले.  शिवसेनेची ताकद कमी झाल्यानेच बहुधा भाजपने मनसेला बरोबर घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा हल्ला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चढविला. ठाकरे बंधू एकत्र यावेत असे म्हणणारे आता तसे प्रयत्न करणार नाही, असे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हे का सांगत आहेत, असा सवाल त्यांनी केला.
सत्ताधारी आघाडीच्या समन्वय समितीची बैठक बोलाविण्याची मागणी राष्ट्रवादीने महिनाभरापूर्वी केली असली तरी मुख्यमंत्र्यांनी त्याला दाद दिलेली नाही. उद्धव ठाकरे यांचे सादरीकरण बघण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ आहे, पण बैठकीसाठी नाही अशी टिका मलिक यांनी केली. रेसकोर्सवरून मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेवरून मुख्यमंत्री व शिवसेनेतील मधुचंद्र संपलेला दिसतो, असा टोलाही  हाणला.
राष्ट्रवादीच्या या टिकेची दखल घेत विदर्भातील पाच जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीने भाजपबरोबर केलेल्या समझोत्यावरून काँग्रेसने राष्ट्रवादीला टोचले. पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने भाजपबरोबर केलेली हातमिळवणी तोडावी, असा सल्लाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला दिला.

Story img Loader