गुजरातने महाराष्ट्रापेक्षा अनेक क्षेत्रांत प्रगती केल्याचे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी सांगत असले, तरी जीवनदान देणाऱ्या रक्तदानाच्या अमूल्य क्षेत्रात मात्र महाराष्ट्राने केवळ गुजरातलाच नव्हे तर देशातील सर्व राज्यांना मागे टाकले आहे. महाराष्ट्राचा हा विक्रम केवळ एका वर्षांपुरताच नाही. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राने ऐच्छिक रक्तदानाच्या क्षेत्रात अव्वल कामगिरी बजावली असून, २०१३ मध्ये रक्ताच्या तब्बल १४.७६ लाख पिशव्या जमा करण्यात आल्या. यातील ९४.२६ टक्के रक्त हे ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून गोळा करण्यात आले आहे.
 राज्य रक्तसंक्रमण परिषदेने लोकसंख्येच्या एक टक्का रक्त गोळा करण्याचे उद्दिष्ट ओलांडून १.२७ टक्के रक्ताच्या पिशव्या यंदाच्या वर्षी जमा केल्या आहेत. गेल्या एकाच वर्षांत १४ लाख ७६ हजार पिशव्या हा आगळा विक्रम असून यासाठी महाराष्ट्रात २१,७०० रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.  राजकारण्यांनी आपला वाढदिवस रक्तदान करून साजरा करावा, बुवा-बाबा-महाराजांकडे असलेला प्रचंड शिष्य समुदाय लक्षात घेऊन त्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन, रल्वे स्थानकामध्ये व्यापक प्रमाणात रक्तदान शिबिरांसह रक्तदाते व या क्षेत्रातील स्वयंसेवी संघटनांसाठी विविध प्रोत्साहनात्मक उपक्रम राबवून हे रक्त गोळा करण्यात येत असून, महाराष्ट्राच्या या कामगिरीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारचे एक पथक महाराष्ट्रात आले असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सांगितले. मुंबईत बीपीटी, रेल्वे आणि जे.जे. महानगर रक्तपेढीत रक्त साठवणूक केंद्र स्थापन करण्यात असे असून, आगामी वर्षांत मालवणी, मुलुंड ईएसआयएस, व्ही.एन. देसाई रुग्णालय, कांदिवली शताब्दी, वसई पालिका रुग्णालय, कुर्ला भाभा आणि डहाणू येथे अशी केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत, असेही शेट्टी यांनी सांगितले.
गरजू रुग्णांना हवे तेव्हा आणि हवे तेथे रक्त उपलब्ध व्हावे यासाठी ‘ब्लड ऑन कॉल’सारखी अभिनव योजना नुकतीच सुरू झाली असून, यासाठी असलेल्या १०४ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी केल्यास एवघ्या एका तासात तुम्हाला हवे असलेल्या ठिकाणी रक्तमिळते. ७ जानेवारीपासून आतापर्यंत ५८१३ लोकांनी रक्तासाठी दूरध्वनी केला असून, यातील प्रत्येकाला रक्त उपलब्ध करून देण्यात आले आहे  
डॉ. संजयकुमार जाधव, सहाय्यक संचालक, ‘राज्य रक्त संक्रमण परिषद’

Story img Loader