मुंबई : विभागीय अंतिम फेरीत लक्षवेधी एकांकिकांचे सादरीकरण करत महाअंतिम फेरीत दाखल झालेल्या सर्वोत्तम आठ संघांमध्ये ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ ठरण्यासाठी आज, शनिवारी चुरस रंगणार आहे. माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात सकाळी ९.३० वाजेपासून महाअंतिम फेरी रंगणार आहे. युवा रंगकर्मींचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या रंगमंचीय आविष्काराला दाद देण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेत दर्जेदार सादरीकरण करून ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ ठरण्यासाठी विविध महाविद्यालयांतील युवा रंगकर्मींनी कौशल्य पणाला लावले आहे. संहितेच्या निवडीनंतर सामूहिक वाचन, लेखक- दिग्दर्शकांसह आजी- माजी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा, व्यक्तिरेखांवर काम करून कसदार अभिनय करण्यावर भर, कथेला साजेसे नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा, रंगभूषा आणि संगीत निर्मितीवर विशेष लक्ष देऊन अत्यंत प्रभावीपणे एकांकिका सादर करण्यासाठी सुरू असलेली लगबग विविध महाविद्यालयांमध्ये सुरुवातीपासूनच पाहायला मिळाली. ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेचे प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरीचे आव्हान यशस्वीपणे पेलून महाअंतिम फेरीत दाखल झालेल्या आठही नाट्यसंघांनी जोरदार तयारी केली असून ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ हा किताब पटकावण्यासाठी यंदाही चुरस रंगणार आहे. युवा रंगकर्मींमधील सुप्त कलागुणांना वाव देणारी आणि कलाक्षेत्रातील व्यावसायिक संधींची कवाडे खुली करून देणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा नाट्यप्रेमींना नेहमीच आकर्षित करत आली असून दर्जेदार एकांकिकांमुळे चुरशीची ठरली आहे. त्यामुळे (पान ८ वर)(पान १ वरून) यंदा कोणत्या महाविद्यालयाची एकांकिका अव्वल ठरून महाअंतिम फेरीत ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ ठरते, याकडे नाट्यवर्तुळाचे लक्ष लागले आहे. महाअंतिम फेरीत ‘लोकसत्ता लोकांकिका’ हा बहुमान पटकावण्याबरोबरच अभिनयासह विविध विभागांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कलाकारांना पंकज त्रिपाठी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच महाअंतिम फेरीचा हा सोहळा अनुभवण्यासाठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारही उपस्थित राहणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra folklore actor pankaj tripathi to attend grand finale mumbai news amy