मुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेसमधील प्रभावी नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आपण पुढील राजकीय भूमिका दोन दिवसांत स्पष्ट करणार असल्याचे चव्हाण यांनी म्हटले असले तरी, ते भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत आहेत. त्यांच्यामागोमाग आणखी काही आमदार बाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसची मोठी राजकीय कोंडी झाली आहे.
राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांच्या उपस्थितीत मुंबईत टिळकभवनात रविवारी झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीस चव्हाण यांनी हजेरी लावली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी ११ च्या वाजल्याच्या दरम्यान चव्हाण यांचे काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याचे पत्र टिळकभवनात येऊन धडकल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हेही वाचा >>> चावडी : प्रदेशाध्यक्षांच्या कबुलीने प्रश्न
चव्हाण हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य होते. सोमवारी सकाळी विधानभवनात विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांचे विश्वासू सहकारी माजी आमदार अमर राजूरकर हे त्यांच्या राजीनाम्याचे पत्र घेऊन टिळक भवन या प्रदेश काँग्रेस कार्यालयात दाखल झाले. त्या पत्रावर चव्हाण यांनी माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख केला होता. राजूरकर यांनीही काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.
महाराष्ट्रातील एक प्रभावी राजकीय घराण्यातील अशोक चव्हाण यांनी सुरुवातीला पक्षसंघटनेत काम केले, मात्र वयाच्या २९ व्या वर्षी
( १९८७-१९८९ ) त्यांना लोकसभेचे खासदार होण्याची संधी मिळाली. त्यानंतर युती सरकारचा साडे चार वर्षांचा आणि फडणवीस सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ वगळता अशोक चव्हाण कायम सत्तास्थानी राहिले आहेत. महसूल, परिवहन, उद्याोग, सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची खाती त्यांनी मंत्री म्हणून संभाळली. २००८ ते २०१० या कालावधीत त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. त्या काळाच आदर्श घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे २०१५ ते २०१९ पर्यंत त्यांनी प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही संभाळली.
गेल्या वर्षी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात दाखल होण्याआधी काही दिवस चव्हाण यांचा गट भाजपमध्ये जाणार, अशा चर्चाना उधाण आले होते. त्यावेळीही त्यांनी नांदेडमध्ये खास कार्यकर्ता मेळावा घेऊन आपण काँग्रेस सोडणार, असा संशयसुद्धा कोणी घेऊ शकणार नाही, असा दावा केला होता. आता महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असतानाच चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
नवी दिल्लीत काँग्रेसमध्ये धावपळ
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर सोमवारी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या गटामध्ये प्रचंड खळबळ उडाली. महाराष्ट्रातील बदलत असलेली राजकीय परिस्थिती तसेच, राज्यातील राज्यसभेच्या उमेदवारीसंदर्भात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी सोमवारी पंजाबमध्ये गेलेले खरगे नवी दिल्लीमध्ये परत आल्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला. संध्याकाळी सहाच्या सुमारास काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अजय माकन, सलमान खुर्शीद यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांनीही खरगेंचे निवासस्थान गाठले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही दिल्लीला पाचारण करण्यात आले.
नव्या राजकीय परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या दोन्ही घटक पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीवर निर्णय घेण्यासाठी खरगेंच्या निवासस्थानी केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.
पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी नेत्यांची तातडीने बैठक
राज्यसभा निवडणूक काँग्रेससाठी कठीण?
चव्हाण यांनी निष्ठावान आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला तर, विधानसभेतील काँग्रेसचे संख्याबळ कमी होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये राज्यसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणणे कठीण असेल. राज्यसभेसाठी उमेदवाराच्या विजयासाठी पहिल्या क्रमांकाची ४२ मते गरजेची आहेत. काँग्रेसने अजून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी घोषित केलेली नाही. महाराष्ट्रातील ६ जागांपैकी एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून येऊ शकतो. काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने पक्षाकडून उमेदवार उभा जाईल. यावेळी स्थानिक उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे.
१५ फेब्रुवारीला प्रवेश शक्य
आपली पुढील राजकीय भूमिका दोन दिवसांत स्पष्ट करु असे म्हटले आहे. परंतु त्यांचा भाजप प्रवेश जवळपास ठरला असल्याचे संकेत मिळाले आहेत. उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचा जनतेचे नेते असा उल्लेख करणे आणि असे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य करणे, हे चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या संकेतांना दुजोरा देणारे आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १५ फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याचवेळी चव्हाण यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येते. चव्हाण यांचे काँग्रेसमध्ये अनेक समर्थक आमदार आहेत. त्यापैकी काहीजण पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाले तर २७ फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक लढविणे काँग्रेससाठी अवघड ठरणार आहे.