पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि औद्योगिक विकास या आघाडय़ांवर राज्याची परिस्थिती डळमळीत असली तरी ऐषारामी साधनांच्या उपभोगामध्ये मात्र राज्याने आघाडी कायम ठेवली आहे. राज्याच्या खेडय़ापाडय़ात मोबाइल पोहोचले असून एक लाख लोकांमागे सध्या ८५ हजार जणांकडे मोबाइल फोन आहेत. लाखामागे २० हजार लोकांकडे चारचाकी गाडय़ा आहेत. राज्यात वाहनांच्या संख्येत ९.४ टक्यांनी वाढ झाली आहे. एकीकडे खाजगी मोबाइल कंपन्याची चलती असताना एमटीएनएल या सरकारी कंपनीच्या फोनची मागणी सातत्याने घटत असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणीत पुढे आले आहे.अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळूक यांनी राज्याचा सन २०१३-१४चा आíथक पाहणी अहवाल बुधवारी विधिमंडळात सादर केला. राज्याने सर्वच आघाडय़ांवर प्रगती केल्याचे संकेत देणाऱ्या या अहवालात सरकारला अडचणीची ठरणारी आकडेवारी मात्र, लपविण्यात आली आहे.
गाडीवानांची संख्या वाढली
राज्यात आजमितीस सुमारे २ कोटी २० लाख वाहने आहेत. त्यापैकी १०.२ टक्के म्हणजेच २३.४ लाख वाहने एकटय़ा मुंबईत आहेत. मोटरसायकल, स्कूटर अशा दुचाकी वापरणाऱ्यांच्या संख्येत गेल्या वर्षभरात ९.६ टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या १ कोटी ६४ लाख लोकांकडे मोटरसायकल आहे, तर कार, जीप्स अशा आरामदायी गाडय़ा वापरणाऱ्यांच्या संख्येत १०.१ टक्क्यांनी वाढ झाल्याने हलक्या वाहनांची संख्या ३४ लाखावर पोहोचली आहे. वाहनांच्या संख्येत वाढ झाली असली तरी सुदैवाने अपघातांच्या संख्येत घट झाली आहे. राज्यात दर दहा हजार वाहनांमागे ३० अपघात होत असले तरी मुंबईत मात्र हेच प्रमाण १०९ असे आहे.गेल्या वर्षभरात राज्यात ६१ हजार ८९० तर मुंबईत २३ हजार ५१२ अपघात झाले असून त्यात अनुक्रमे १२ हजार १९४ (४१ हजार जखमी) आणि ४९६ (४ हजार २५०जखमी) लोकांना आपला जीव गमावावा लागला.
केवळ ६ लोकल वाढल्या
मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर अशा चारही मार्गावर सध्या २०१ उपनगरीय रेल्वे गाडय़ा रोजच्या २ हजार ७७८ फेऱ्यांच्या माध्यमातून धावतात. विशेष म्हणजे उपनगरीय प्रवाशांची संख्या वाढत असली तरी गाडय़ांच्या संख्येत मात्र मामुली म्हणजेच वर्षभरात केवळ ६ गाडय़ांची भर पडली आहे.
देशांतर्गत विमान प्रवासी घटले
राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर असे तीन आंतरराष्ट्रीय व सात देशांतर्गत विमानतळ आहेत. वर्षभरात आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत ९५.९९ लाखावरून ९८.३८ लाख अशी २.४९ टक्क्यांची वाढ झाली असली तरी देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत मात्र ३.३४ टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत २.५० टक्क्यांची वाढ झाली आहे. पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत ६.२५ टक्यांची घट झाली.
बेस्ट, टीएमटीची धाव डळमळीत
राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी संख्येत गेल्या वर्षभरात ०.८ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी बेस्टच्या प्रवाशांची संख्या मात्र घटली आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेनंतर सर्वात महत्त्वाची वाहतूक व्यवस्था समजल्या जाणाऱ्या बेस्टच्या प्रवाशी संख्येत घट होत असल्याने तिचा आर्थिक डोलारा कोसळण्याची भीती आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. मात्र पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या गाडय़ा आणि प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा