‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चे पुरस्कार जाहीर
अमेरिकेतील मराठी माणसांनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ या संस्थेच्या वतीने गेली २० वर्षे साहित्य व सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. या वेळी ‘साधना ट्रस्ट’च्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. एकूण १० पुरस्कार दिले जाणार असून साहित्य जीवनगौरव पुरस्कार लेखक सुरेश द्वादशीवार आणि सामाजिक जीवनगौरव पुरस्कार विद्या बाळ यांना जाहीर झाला आहे.
दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. साहित्य पुरस्कारामध्ये शरद बेडेकर यांच्या ‘समग्र निरीश्वरवाद’ या पुस्तकाला वैचारिक ग्रंथ पुरस्कार, नितीन दादरवाला यांच्या ‘प्रतिमा प्रचीती’ या पुस्तकाला अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या ‘खेळकर’ कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार व रा.श. दातार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाटय़ पुरस्कार अजित देशमुख यांच्या ‘सुस्साट’ या नाटकाला दिला जाणार आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिपुरस्कार उत्तम कांबळे यांना दिला जाणार असून या वेळी एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह देण्यात येईल. समाजकार्य या क्षेत्रात भीम रासकर यांना ‘प्रबोधन’ या विभागात, कृष्णा चांदगुडे यांना ‘सामाजिक प्रश्न’ या विभागात, तर पल्लवी रेणके यांना ‘असंघटित कष्टकरी’ या विभागातील पुरस्कारांसोबत प्रत्येकी ५० हजार रुपये व स्मृतिचिन्ह देण्यात येतील. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ९ जानेवारी २०१६ रोजी सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरणाचा समारंभ आयोजित केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा