महाराष्ट्रात आत्तापर्यंत जे स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले त्यांची थोडक्यात माहिती आणि छायाचित्र यांचे संकलन आता ‘ई-बुक’ स्वरूपात उपलब्ध झाले आहे. मराठवाडा विभागातील स्वातंत्र्यसैनिकांचा परिचय असलेले ई-बुक यापूर्वीच प्रकाशित झाले असून आता लवकरच विदर्भ विभागातील स्वातंत्र्यसैनिकांचे ई-बुक प्रकाशित होणार आहे. राज्य शासनाच्या गॅझेटिअर (दार्शनिक)विभागातर्फे हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांची माहिती सर्वाना व्हावी या उद्देशाने काही वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागातील स्वातंत्र्यसैनिकांची माहिती सहा खंडामध्ये प्रकाशित करण्यात आली होती. या तीनही विभागाचे अनुक्रमे ३, २ आणि १ असे खंड प्रकाशित झाले होते. सध्या हे खंड उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याचे पुर्नप्रकाशन करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती गॅझेटिअर विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
विदर्भ विभागाचे दोन खंड आता लवकरच नव्याने प्रकाशित होणार असून मराठवाडा विभागाचे खंड गेल्या वर्षी प्रकाशित झाले. पश्चिम महाराष्ट्रातील खंडांच्या प्रकाशनाचे काम सुरू असल्याचे सांगून डॉ. पाठक म्हणाले की, मराठवाडा विभागाचा खंड ‘ई-बुक’स्वरूपातही प्रकाशित झाला आहे. विदर्भ विभागाच्या खंडही ‘ई-बुक’ स्वरूपात तयार करण्यात आला आहे. मुद्रित स्वरूपातील प्रत्येक खंड सुमारे तीनशे पानांचा आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ०२२-२२६९११२४/२२६७८७७९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra freedom fighter in e book now
Show comments