रसिका मुळय़े; लोकसत्ता

मुंबई : राज्यातील शासकीय कला महाविद्यालयांना आता मानचिन्हे तयार करणे, चित्ररथ तयार करणे अशी शासकीय आणि खासगी संस्थांची काम करून कमावण्याची मुभा मिळणार आहे. महाविद्यालयांबरोबरच या कामांमध्ये सहभागी होणाऱ्या आजी, माजी विद्यार्थ्यांनाही मानधन मिळणार आहे.  त्याचबरोबर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभवही मिळू शकणार आहे.

खासगी आणि शासकीय संस्थांची बोधचिन्हे तयार करणे, कार्यालयांची अंतर्गत सजावट, चित्ररथ तयार करणे, माहितीपत्रके, भित्तीपत्रके तयार करणे अशा स्वरूपाची अनेक कामे असतात. कला महाविद्यालयांना अशी कामे करण्याची परवानगी मिळावी असा प्रस्ताव शासनाकडे गेली अनेक वर्षे पडून होता. त्या अनुषंगाने शासनाने आता शासकीय कला महाविद्यालयांना बाहेरील संस्थांची कामे व्यावसायिक स्वरूपात घेण्याची परवानगी दिली आहे. मुंबईतील सर ज. जी. कला महाविद्यालयासह औरंगाबाद, नागपूर येथे शासकीय कला महाविद्यालये आहेत. व्यावसायिक कामे करताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, शैक्षणिक उपक्रमांमध्ये व्यत्यय येणार नाही अशी काळजी घ्यावी, अशी सूचना शासनाने महाविद्यालयांना दिली आहे.

कामे कोणती?

विविध माध्यमातून शिल्प, पुतळे तयार करणे, व्यक्तिचित्रे रेखाटणे, चित्ररथ तयार करणे, त्रिमिती रूप (थ्रीडी मॉडेल्स) तयार करणे, सुशोभीकरण, मानचिन्ह तयार करणे, चित्र, शिल्प, कलाकृतींचे मूल्य निश्चित करणे, बोधचिन्ह तयार करणे, छायाचित्रण करणे, माहितीपट तयार करणे, कला दिग्दर्शन करणे अशी कामे महाविद्यालये करू शकतील.

मानधन कसे मिळणार?

कामाच्या मानधनातील ४० टक्के रक्कम ही सहभागी आजी, माजी विद्यार्थ्यांना वाटण्यात येईल, २५ टक्के रक्कम सहभागी शिक्षक, अधिष्ठाता यांच्यात वाटण्यात येईल.

महाविद्यालयाच्या खात्यात २५ टक्के रक्कम जमा करण्यात येईल, तर १० टक्के रक्कम कला संचालनालयाला द्यावी लागणार आहे.

मोठय़ा कामांसाठी शासनाची परवानगी लागणार

साधारण २५ लाख रुपयांपर्यंतची कामे कला संचालनालयाच्या परवानगीने महाविद्यालयांना स्वीकारता येतील तर त्यावरील रकमेची कामे घ्यायची असल्यास शासनाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.

लोकसत्ताच्या वृत्तानंतर..

शासनाकडून मिळणारा अपुरा निधी आणि क्षमता असूनही इतर संस्थांचे काम करून कमावण्यास असलेले निर्बंध यामुळे कला महाविद्यालयांची होणारी कोंडी सर ज. जी कला महाविद्यालयाचे प्रश्न मांडण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने गेल्या आठवडय़ात मांडली होती. आता सरकारने कला महाविद्यालयांना बाहेरील कामे करून अर्थार्जनाची मुभा दिली आहे.

Story img Loader