मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे नियमन करणाऱ्या प्रवेश नियामक प्राधिकरणच्या अध्यक्षपदी राज्य सरकारने सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव समीर कुमार विश्वास यांची नियुक्ती केली असून अखेर सात महिन्यांनंतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्राधिकरणला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला आहे.
विश्वास यांचा नियुक्ती कार्यकाळ नामनिर्देशनाच्या दिनांकापासून पाच वर्षे किंवा वयाच्या ६५ वर्षांपर्यंत असणार आहे. सात महिन्यांपासून हा कार्यभार शुल्क नियंत्रण प्राधिकरणाचे (एफआरए) अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती विजय अचलिया यांच्याकडे होता.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या १९ हून अधिक प्रवेश परीक्षा आणि सहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या प्रवेश मान्यता प्रक्रियेची जबाबदारी एआरएवर आहे. मात्र एआरएचे अध्यक्ष माजी मुख्य सचिव जे.पी. डांगे यांचा कार्यकाळ २१ ऑगस्ट २०२४ रोजी संपल्यानंतर त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार शुल्क नियंत्रण प्राधिकरणाचे (एफआरए) अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती विजय अचलिया यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
मात्र एआरएला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याने प्रवेश प्रक्रियेतील दस्तऐवज पडताळणी, प्रवेश निश्चिती आणि संस्थांच्या तपासणीसह अनेक निर्णय लांबणीवर पडत होते. मान्यता प्रक्रियेतील अनेक महत्त्वाच्या कामांवर परिणाम होऊन ती प्रलंबित राहिली होती. त्यामुळे अध्यक्ष नियुक्ती करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागावर मोठा दबाव होता.
माजी मुख्य सचिव जे.पी. डांगे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सरकारने नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी तब्बल सात महिन्यांचा कालावधी घेतला. दरम्यान, एफआरए अध्यक्ष अचलिया यांच्याकडेच दोन्ही प्राधिकरणांची जबाबदारी होती, मात्र प्रवेश प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी स्वतंत्र अध्यक्षाची मागणी होत होती. आता समीर कुमार विश्वास यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असून, विद्यार्थी व महाविद्यालयांच्या प्रवेश मान्यतेच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.